यवत : अवघ्या महिनाभरापूर्वी आठवडे बाजारात २० ते २५ रुपये जुडी दर मिळाल्याने यवत परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी मेथी पिकाकडे मोर्चा वळवला.
मोठ्या क्षेत्रावर मेथीची लागवड करण्यात आली. मात्र आता अचानक बाजारभाव कोसळल्याने व्यापारी वर्ग मेथी खरेदीस टाळाटाळ करत आहे. परिणामी, कष्टाने पिकवलेल्या मेथीचे करावे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
सध्या अनेक शेतांत मेथीला फुलोरा येऊ लागला आहे. बाजारात नेऊन वाहतूक, हमालीचा खर्च करण्यापेक्षा काही संतप्त शेतकरी उभ्या पिकात बकऱ्या सोडत आहेत, तर काही ठिकाणी मेथी शेतातच सोडून दिल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.
याच काळात कांद्याच्या भावात दिवसेंदिवस घसरण होत असून, अतिवृष्टीमुळे सुमारे ७० टक्के कांद्याची रोपे खराब झाली आहेत. त्यामुळे कांदा लागवडीसाठी राखून ठेवलेली जमीन रिकामीच पडून आहे.
कारखाना हंगाम सुरू असल्याने उसाचे क्षेत्रही मोकळे होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांकडे वळत उत्पादन वाढवले; मात्र बाजारातील अनिश्चिततेमुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
नाथचीवाडी येथील शेतकरी धैर्यशील झाडगे यांनी दहा गुंठे क्षेत्रात १५ किलो मेथीची लागवड केली होती. एक ते दीड महिना कुटुंबीयांसह काबाडकष्ट करून त्यांनी भाजी पिकवली.
जारो रुपयांचा खर्च करून, रक्ताचे पाणी करून उगवलेली मेथी कवडीमोलाने विकण्यापेक्षा ती मातीत मिसळण्याचा कठोर निर्णय त्यांना घ्यावा लागत आहे.
आज-उद्या बाजारभाव वाढतील आणि चार पैसे मिळतील, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी मेथी शेतातच ठेवली आहे. मात्र मशागत, बियाणे, पेरणी, औषध फवारणी यांचा आर्थिक भार वाढतच चालला आहे.
रोगांचा प्रादुर्भाव
गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून, सतत औषध फवारणी करावी लागत आहे. खर्च वाढत असताना बाजारभावाचा कोणताही भरवसा राहिलेला नाही.
वातावरणातील बदलामुळे पिकावर सतत औषध फवारणी करावी लागते. त्यातच बाजारभावाचा काहीच भरवसा राहिला नाही. खर्च करून देखील हाताशी आलेल्या पिकाला आता काढायलाही परवडत नाही. पीक कसे पिकवायचे हे आमच्या हातात आहे, पण त्याला भाव मिळणे आमच्या नशिबात नाही. - धैर्यशील झाडगे, शेतकरी नाथचीवाडी
अधिक वाचा: राज्यात ‘या’ प्रकारातील लाभार्थ्यांचे रेशनकार्ड होणार आता रद्द; पुरवठा विभागाची नवी मोहीम सुरु
