पुणे/मलठण : उत्तर पुण्यामध्ये बिबट्याची प्रचंड दहशत सद्यस्थितीत पाहायला मिळत आहे. सध्या शेतीच्या कामाला वेग आला आहे.
परंतु रात्रंदिवस या संपूर्ण परिसरात बिबट कधी कुठे निदर्शनास येईल याचा नेम नाही. त्यामुळे गाव वाडीतस्त्यांमधील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली जगत आहे.
अशातच स्वरक्षणासाठी महिलांवर गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ आली आहे. शिरूर तालुक्याच्या पिंपरखेड भागातील ग्रामस्थांनी ही नवी शक्कल लढवली आहे.
पिंपरखेड (ता. शिरूर) येथे रोहन बोंब या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे २० दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक होऊन रास्ता रोको आंदोलन केले अखेर वनविभागाने त्या बिबट्याला ठार केले.
सर्व ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली होती. वनविभागाकडून पिंजरेही लावले जातात परंतु त्यामध्ये भक्ष्यांचा अभात तसेच बिबट्या पिंजऱ्यामध्ये न येणे असे प्रकार वारंवार घडत आहेत, दिवस-रात्र बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे.
त्यातच शेतीच्या कामाला वेग आला आहे. शेत हेच उपजीविकेचे साधन असल्याने, शेतात जाण्याविना या शेतकऱ्यांसमोर पर्याय नाही. पण त्यावेळी बिबट्याच्या हल्ल्यातून जीव कसा वाचवायचा? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलायं.
बिबट्या प्रामुख्याने मानेवर हल्ला करून, नरहीचा घोट घेतोय. अशा प्रसंगी शेतात काम करताना या बिबट्याने आपली शिकार करू नये, म्हणून महिलांनी टोकदार खिळे असलेला पट्टा थेट गळ्यात घातला आहे. गावातील वृद्धांनीही असा पट्टा घालण्यास सुरुवात केली आहे.
काही दिवसांपूर्वी बिबट-कुत्र्याचा संघर्ष पाहिला. त्यावरून ही संकल्पना पुढे आली. बाजारातून टोकदार खिळ्यांचा पट्टा आणला. आता तो गळ्यात घालून आम्ही शेतात काम करत आहोत. - उषा ज्ञानेश्वर ढोमे, ग्रामस्थ
बिबट्याबरोबर कुत्र्याचा संघर्ष सुरू होता. त्यावेळी कुत्र्याच्या गळ्यात पट्टा होता. कुत्रा वाचणार नाही असे वाटत होत. पण तो बचावला. त्यावरून ही संकल्पना पुढे आली. शेतात काम करत असताना जर आपणही असा पट्टा घातला तर आपणही बिबट्याच्या हल्ल्यातून वाचू शकतो असे वाटल्याने आम्ही त्याचा वापर सुरू केला आहे. - सुनीता संतोष ढोमे, ग्रामस्थ
अधिक वाचा: कृषी समृद्धी योजनेंतर्गत 'या' चार घटकांसाठी आला ५,६६८ कोटींचा निधी; शेतकऱ्यांना कसा होणार फायदा?
