राजाराम लोंढे
कोल्हापूर : जिल्ह्यात वाट्याची (उत्पन्नातील हिस्सा) शेती करण्याची पद्धत हळूहळू संपुष्टात येत आहे. निम्मे उत्पन्न देतो; पण कोणी शेती करता का? अशी म्हणण्याची वेळ बड्या शेतकऱ्यांवर आली आहे.
वर्षभर राबून जेवढे उत्पन्न मिळत नाही, त्यापेक्षा दुप्पट मजुरी करून मिळत आहे. शेती वाट्याने देण्याची पद्धत सगळीकडेच आहे.
पिकानुसार हा 'कर्त्या शेतकऱ्याचा' हिस्सा ठरवला जातो. उसाची शेती वाट्याने देताना जमीनदार व 'कर्त्या'मध्ये अलिखित करार होतो.
यामध्ये जमीन, पाणी, मशागत, खताच्या पैशाची जबाबदारी जमीनदाराकडे तर पिकाची आंतरमशागत 'कर्त्या' करतो. या पोटी 'कर्त्या'ला एकूण उत्पन्नाच्या चौथा हिस्सा दिला जातो.
साधारणतः जिल्ह्यात उसाची सरासरी उत्पादकता एकरी ४० टन आहे. वर्षभर राबून दहा टनाचे तीस हजार रुपये 'कर्त्या' शेतकऱ्याला मिळतात. म्हणजे महिन्याला २५०० रुपये होतात. त्यापेक्षा शेतमजुरी केली तर त्यापेक्षा दुप्पट पैसे हातात येतात.
शासनाकडून प्रत्येक कुटुंबाला मोफत धान्य मिळते. लाडकी बहीण, श्रावणबाळ संजय गांधी पेन्शन, 'नमो पेन्शन' व 'पीएम किसान' योजनेच्या माध्यमातून महिन्याला बहुतांशी कुटुंबात किमान चार हजार रुपये येतात. त्यामुळे दिवसभर उन्हात काम करण्याची मानसिकता कमी झाली आहे.
पिकाला दराची गॅरंटी कोणाची?
वाट्याने शेती केली तर त्यातून काढल्या जाणाऱ्या शेतीमालाला चांगला भाव मिळेल, याची गॅरंटी शेतकऱ्यांना नसल्याने उदासीनता दिसत आहे.
निसर्गाच्या अवकृपेची भीती
कष्ट करून पिके फुलवायची आणि अतिवृष्टी, गारपीट, महापूरसह इतर नैसर्गिक संकटाचे काय? निसर्गाची अवकृपा झालीच तर पिकवलेले सगळे पाण्यात जाते.
शासनाच्या धोरणामुळे शेती आतबट्यात आली. त्यात कष्टकरी लोकांच्या घरात महिन्याला योजनांचे पैसे येऊ लागल्याने कष्टाच्या कामाची मानसिकता कमी झाली. हिश्शाने शेती करण्यास कोणी पुढे येत नाही. - चंद्रकांत खेडे, शेतकरी, आणूर, ता. कागल
हिश्शाने शेती परवडत नाही. वर्षाने तेही उत्पन्नातील चौथा हिस्सा मिळणार. तेवढेच कष्ट इतर ठिकाणी केले तर चांगले पैसे मिळतात. - मारुती खाडे, शेतकरी, सांगरूळ
अधिक वाचा: जत तालुक्यातील शेतकरी रवी पाटलांनी एकरी १७ टनांचे उत्पादन घेत सीताफळ शेतीत केली क्रांती