समाधान इंदलकर
शेतकरी फक्त उत्पादक राहिला तर नागवला जातो; पण तो जेव्हा स्वतः व्यापारी बनतो, तेव्हाच त्याच्या कष्टाला खरी किंमत मिळते, हे धाराशिव जिल्ह्याच्या वालवड (ता. भूम) येथील एका तरुण शिक्षकाने आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.
चिंचपूर ढगे येथील युवा प्रगतिशील शेतकरी आणि वालवड इंग्लिश स्कूलचे शिक्षक शुभम अंधारे यांनी मध्यस्थांना फाटा देत अवघ्या ३० ते ४० मिनिटांत १०० किलो द्राक्षांची थेट विक्री करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
अनेकदा शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याची तक्रार असते. यावर उपाय म्हणून अंधारे यांनी स्वतःचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे ठरवले. भूम येथील गोलाई चौकात त्यांनी स्वतः उभे राहून द्राक्षांची विक्री सुरू केली.
पाहता-पाहता ग्राहकांनी गर्दी केली आणि तासाभराच्या आतच सुमारे १०० किलो द्राक्षांचा फडशा पडला. विशेष म्हणजे, ही द्राक्षे १०० ते १२० रुपये प्रतिकिलो दराने विकली गेली.
बाजारातील दलाल आणि मध्यस्थ टाळल्यामुळे शेतकऱ्याला चांगला नफा मिळाला, तर ग्राहकांनाही शेतातून आलेली ताजी आणि दर्जेदार द्राक्षे रास्त दरात मिळाली. अंधारे हे पेशाने शिक्षक असूनही त्यांनी शेतीची परंपरा जपत 'शिक्षक, शेतकरी आणि व्यापारी' अशी तिहेरी भूमिका लीलया पेलली आहे.
आपल्या कष्टातून तयार झालेला माल आपणच बाजारात नेऊन विकला, तरच त्याची खरी किंमत मिळते. शेतकऱ्यांनी आता आधुनिक विचार करून थेट विक्रीकडे वळायला हवे. - शुभम अंधारे, युवा शेतकरी.
