वाडा : दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस आतुरतेने ज्याची सर्वच बाजारपेठेत वाट पाहिली जाते असा औषधी गुणधर्म असलेला वाडा तालुक्यातील चांबळे येथील प्रसिद्ध पांढरा कांदाबाजारात दाखल झाला आहे.
शेतातून कांदा काढून त्याच्या माळा बनवून कांदा विक्रीस बाजारात उपलब्ध झाला आहे. सध्या दोन किलो वजनाची एक माळ १३० रुपये प्रमाणे विकली जात आहे.
अनेक संकटावर मात करत चांबळा गावातील शेतकऱ्यांनी यावर्षी पांढरा कांदा पिकविला आहे. भात पीक कापणी झाल्यानंतर पांढरा कांदा लागवडीला येथे शेतकरी सुरुवात करतात.
वाडा तालुक्यात चांबळा, डाखवली, असनस, चिखला, गातेस, केळठण या काही मोजक्याच गावांत पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते.
पोषक वातावरण आणि पारंपरिक लागवड यामुळे आजही पांढरा कांदा आपले औषधी गुणधर्म टिकवून आहे. बाजारात या कांद्याला मोठी मागणी आहे आणि ती दरवर्षी वाढतच असते.
तालुक्यात चांबळे, डाकीवली, केळठण या गावांमध्ये पांढऱ्या कांद्याचे पीक घेतले जात असे. त्यानंतर तालुक्यात इतरही गावांमध्ये पांढऱ्या कांद्याची लागवड शेतकरी करू लागले आहेत.
यावर्षी तालुक्यात बऱ्यापैकी पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली आहे. यंदा नैसर्गिक संकटांवर मात करत बऱ्यापैकी पांढऱ्या कांद्याचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले आहे.
यंदा पांढऱ्या कांद्याला चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्याला आहे. शेतात कांदा तयार झाला असून, बहुतांश शेतकरी काढणी करीत आहेत.
पांढऱ्या कांद्याचे औषधी गुणधर्म
- अभ्यासकांच्या माहितीनुसार, या कांद्यात औषधी गुणधर्म आहेत.
- कांद्यात मिथाईल सल्फाईड, अमिनो अॅसिड हे घटक असतात. ज्यामुळे कोलेस्ट्रोलचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.
- पोटातील उष्णता कमी होण्यासाठी कांदा उपयुक्त ठरतो.
- रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
- जर सर्दी, कफची समस्या असेल तर ताज्या कांद्याचा रस मध टाकून प्यायल्यास ही समस्या दूर होते.
- सध्या कांदा काढणी सुरू असून, तो सुकवून माळा तयार केल्या जात आहेत.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग परिसरातील पांढऱ्या कांद्याला चांगला भाव मिळतो, मात्र आपल्याकडे उत्पादन खर्चाच्या मानाने भाव मिळत नाही, शासनाने पांढऱ्या कांद्याला अनुदान देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. - विवेक कृष्णा पाटील, पांढरा कांदा उत्पादक शेतकरी, चांबळे
अधिक वाचा: Mango Market Mumbai : मुंबई बाजार समितीवर आंब्याचे राज्य; कोणत्या आंब्याला किती दर? वाचा सविस्तर