सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यात बुधवारी सांयकाळी काही गावांत चक्रीवादळासह झालेल्या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या आंबा, केळी, चिकूच्या बागांचे मोठे नुकसान झाले.
याबरोबरच काही शेतकऱ्यांचे पत्र्याचे शेड उडून गेले. कव्हे गावातील महावितरणचे पोल कोसळून ट्रान्सफॉर्मरखाली पडल्याची घटना घडली. यात कव्हे, कोरफळे, बळेवाडी, कासारवाडी, सौंदरे या भागात झालेल्या चक्रीवादळी पावसामुळे शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान झाले आहे.
यात कव्हे येथील सलग दोन दिवस झालेल्या वादळी पावसाने फळबागा विशेषत आंब्याचे नुकसान होऊन त्यात शेतकरी दत्तात्रय जाधव यांचे हाती आलेल्या केशर आंब्याच्या १० झाडांवरील आंबे पडून आर्थिक नुकसान झाले. तर शिरीष घळके यांच्याही शेतातील आंबे पडून मोठे नुकसान झाले.
या वादळी वाऱ्यातील पावसाने गावातील शामराव शिंदे व दगडू शिंदे यांचे दारातील विद्युत पोल पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला, तर कव्हे येथील जिल्हा परिषद शाळेच्या आतील बाजूस असलेल्या विद्युत पोलवरील ताराही तुटून पडल्या.
तसेच याच गावातील काही घरांवरील पत्रे उडून गेले, तर याच कव्हे गावाजवळ असलेल्या माने वस्ती येथे बसविलेला महावितरणाचा डीपी वादळामुळे अर्धवट वाकडा होऊन तेथील वीजपुरवठा बंद पडला.
सौंदरेत गारांचा वर्षाव; कांदा भिजला
तालुक्यातील सौंदरे येथेही वादळी पावसाने धुमाकूळ घालून विजेचा कडकडाट व गाराचा वर्षाव होऊन त्याचा फटका येथील येथील जिल्हा परिषद शाळेला बसला. शाळेच्या काही खोल्यांवरील पत्रे शिवाय काही नागरिकांच्या घरांवरील पत्रे उडून गेले.
तर याच गावातील शेतकऱ्यांनी कांदा काढून तो बाजारात विक्रीस नेण्यासाठी शेतात बाळविण्यास ठेवलेला होता तो या बादळी पावसाने भिजला गेल्याने शेतकऱ्याचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले.
करमाळ्यास वादळासह पावसाचा तडाखा; सातोलीतील केळीची बाग झाली भुईसपाट
बुधवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका केळी पिकाला बसला असून, तालुक्यातील सातोली येथील एका शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कोर्टी परिसरात झालेल्या गारपिटीमुळे आंब्याचे नुकसान झाले आहे.
सातोली येथील अशोक गाडे यांची दोन एकर क्षेत्रातील केळीची बाग काढणीसाठी पूर्णपणे तयार होती. मात्र, बुधवारी दुपारी झालेल्या जोरदार वादळामुळे ही संपूर्ण बाग डोळ्यांदेखत भुईसपाट झाली.
दोन एकर बागेसाठी त्यांनी मोठा खर्च आणि मेहनत घेतली होती. नैसर्गिक संकटामुळे त्यांचे २५ ते ३० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज गाडे यांनी व्यक्त केला आहे.
जेऊर भागात बिटरगाव, सांगवी, पांगरे, भाळवणी, जेऊर, शेटफळ, निंभोरे, लव्हे, कोंडेज, कुंभेज, मलवडी, केम, कंदर, सातोली, घोटी अशा आसपासच्या अनेक गावात गारपिटासह वादळी वाऱ्यांमुळे मोठे नुकसान झाले आहे.
घरांवरील पत्रे उडाले
कोर्टीसह परिसरातील गावांना बुधवारी दुपारी अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आंबा, केळी, पोपई, द्राक्षासह फळबागांचे नुकसान झाले असून वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाले.
मुलाप्रमाणे या बागेला जपलं होतं, आता फळ हाती वेण्याची वेळ आली असतानाच निसर्गान सगळं हिरावून नेलं. आता उभं कसं राहायचं? हा प्रश्न आहे. - अशोक गाडे, शेतकरी, सातोली.
अवकाळी पावसात वादळी वारे आणि गारपीट झाली, ज्या-ज्या ठिकाणी शेतीपिकाचे नुकसान झाले आहे त्या ठिकाणी संबंधिताना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. - शिल्पा ठोकडे, तहसीलदार, करमाळा.
हेही वाचा : गोड पेक्षाही अधिक धोकादायक आहेत 'ही' तुमच्या मधुमेहाची खरी कारणे
