रत्नागिरी : आधी निसर्गाच्या लहरीपणाचा आणि नंतर बाजारपेठेतील दर गडगडण्याचा फटका खाल्ल्यानंतर आता शेवटच्या टप्प्यात कॅनिंग कंपन्यांमुळे आंबा बागायतदारांचे अधिकच हाल होत आहेत.
बागायतदारांची अडवणूक करण्यासाठी कॅनिंग कंपन्यांनी आंबा खरेदी पूर्णपणे बंद केली आहे. शेवटच्या टप्प्यातील आंबा अद्याप झाडावरच असल्याने बागायतदार संकटात सापडले आहेत.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनंतर बागायतदारांना दिलासा मिळेल, असे अपेक्षित होते. मात्र, कॅनिंग कंपन्यांनी त्या सूचनेकडेही दुर्लक्ष केले आहे.
हवामानाच्या लहरीपणामुळे आंब्याचे उत्पादन मुळातच १५ ते २० टक्क्यांवर आले आहे. त्याला सुरुवातीला दर चांगला देण्यात आला. मात्र, त्यानंतर दरात घसरण सुरू झाली.
सुरुवातीला दहा हजार रुपये असलेला पेटीचा दर सध्या १००० ते १२०० रुपये इतका कमी झाला आहे. स्थानिक बाजारातही तोच दर आहे.
अन्य राज्यांतील आंब्याची नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक झाली आणि आखाती देशातील युद्धामुळे आंबा निर्यात थांबली. त्यामुळे दर कोसळले आहेत. त्यात आता कॅनिंग कंपन्यांनी संकट उभे केले आहे.
आंबा झाडावरून न उतरवल्यास परिणाम
दर पडल्यामुळे आंबा झाडावरून न उतरवल्यास झाडाच्या आरोग्यावर परिणाम होणार असून, प्रकृती खालावणार आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांची अवस्था 'इकडे आड तिकडे विहीर' अशीच झाली आहे.
गणिते बिघडली
◼️ आंबे काढण्यासाठी दिवसाला ७०० रुपये मजुरी कामगाराला द्यावी लागते.
◼️ वाढत्या उष्म्यामुळे झाडावर चढून आंबे काढणे जिकिरीचे होत असल्याने एक मजूर दिवसाला चार क्रेट इतकाच आंबा काढू शकतो.
◼️ सध्याच्या दराप्रमाणे चार क्रेटला ८५० ते ९०० रूपये मिळतात. त्यामुळे काढलेल्या मालाच्या विक्रीतून केवळ कामगाराची दिवसाची मजुरीच निघू शकते.
◼️ खते, कीटकनाशके, वाहतूक अन्य खर्च निघत नसल्यामुळे बागायतदारांची आर्थिक गणिते विस्कटली आहेत.
अडवणुकीचे धोरण
◼️ यावर्षी मुळातच उत्पादन कमी असल्यामुळे एप्रिलच्या शेवटच्या आठवडचात कॅनिंग कंपन्यांनी आंबा खरेदी सुरू केली. सुरुवातीला ६० रुपये दराने आंबा खरेदी सुरू होती. मात्र, विक्रीसाठी आंबा कमी होता.
◼️ दि. ४ मेपर्यंत दर ५२ रुपयांपर्यंत खाली आला. मात्र, ५ मे नंतर अचानक दर निम्म्यावर आणले. ३० रुपये दराने कॅनिंगसाठी आंबा खरेदी सुरू केली.
◼️ बागायतदारांनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेत दर वाढवून देण्याची मागणी केली. त्यानुसार पालकमंत्री सामंत यांनी कंपन्यांनी ५० रुपये दर देण्याची सूचना केली.
◼️ मात्र, कंपन्यांनी पालकमंत्र्यांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या. कंपन्यांनी आंबा खरेदीच बंद केली. गेल्या दोन दिवसांत आता ५० रुपयांचा दर १३ रुपये इतका खाली आला आहे.
यावर्षीचा हंगाम विचित्र व मनस्ताप देणारा ठरला आहे. मजुरी कशी भागवावी व बँकांची देणी कशी फेडावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने याबाबत सकारात्मक भूमिका घेत कोकणातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घ्यावा. - राजन कदम, बागायतदार
अधिक वाचा: Monsoon Update : नैर्ऋत्य मान्सून येण्याची तारीख जाहीर; किती तारखेला दाखल होणार मान्सून?
Web Summary : Mango farmers in Ratnagiri face hardship as canning firms halt purchases after weather woes and market price drops. Despite minister's intervention, companies ignore pleas, leaving farmers in dire straits with falling prices.
Web Summary : रत्नागिरी के आम उत्पादक मौसम की मार और बाजार में कीमतों में गिरावट के बाद अब कैनिंग कंपनियों द्वारा खरीद रोकने से परेशान हैं। मंत्री के हस्तक्षेप के बावजूद, कंपनियों ने अनुरोधों को अनसुना कर दिया, जिससे किसान बुरी तरह प्रभावित हैं।