Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकरी खर्च जातो लाखावर, दर मात्र १२ रुपयांवर; शेतकऱ्यांनी मांडलं कांद्याचं भयानक वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 10:58 IST

कांदा हे अनेक वर्षापासून प्रमुख आणि नगदी पीक म्हणून घेतले जाते. या पिकावरच परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून आहे.

ओतूर : जुन्नर तालुक्यातील माळशेज परिसरात कांदा हे अनेक वर्षापासून प्रमुख आणि नगदी पीक म्हणून घेतले जाते. या पिकावरच परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून आहे.

मात्र, मागील दोन वर्षांपासून कांदा उत्पादक शेतकरी विविध कारणांमुळे गंभीर आर्थिक संकटात सापडले असून, सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे.

एकरी कांदा उत्पादनासाठी सध्या सुमारे एक लाख रुपयांहून अधिक खर्च येत असताना अपेक्षित उत्पादन मिळत नसून, बाजारातही कांद्याला अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

सध्या बाजार समितीत कांद्याला केवळ १२ ते १६ रुपये प्रतिकिलो इतकाच दर मिळत असल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार◼️ एकरी कांदा लागवडीसाठी बियाण्यांवर सुमारे १० हजार रुपये◼️ शेतीमशागत व वावर बांधणीसाठी ११ हजार रुपये◼️ लागवडीसाठी १५ हजार रुपये◼️ कांदा रोप उपटण्यासाठी ३ हजार रुपये◼️ दोनवेळा खुरपणीसाठी १४ हजार रुपये◼️ कांदा काढणीसाठी १५ हजार रुपये◼️ खत व औषधांवर अंदाजे ३० हजार रुपये खर्च करावा लागत आहे.

याशिवाय मजुरी, वाहतूक व इतर अनुषंगिक खर्च धरल्यास एकूण खर्च एक लाख रुपयांच्या पुढे जात आहे. इतका प्रचंड खर्च करूनही समाधानकारक उत्पादन व बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.

यंदा माळशेज परिसरात हवामानातील बदलांचा मोठा फटका कांदा पिकाला बसला आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला हमीभाव द्यावा, निर्यात धोरणात स्थैर्य आणावे तसेच शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.

उत्पादनात घट◼️ पूर्वी एकरी १८ ते २० टनांपर्यंत उत्पादन मिळत असताना, यंदा ते सरासरी १० ते १२ टनांपर्यंत घसरले आहे.◼️ उत्पादनात जवळपास निम्म्याने घट झाल्याने वाढलेल्या खर्चाची भरपाई करणे शेतकऱ्यांसाठी अशक्य बनले आहे.◼️ परिणामी कर्जबाजारीपणा वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे.◼️ एकीकडे उत्पादनखर्च गगनाला भिडलेला असताना दुसरीकडे बाजारात दर घसरल्याने शेतकरी संकटात आहेत.

सलग दोन वर्षांपासून कांदा पिकवूनही शेतकऱ्यांच्या हातात तोटाच येत आहे. उत्पादनखर्च प्रचंड वाढला असताना बाजारात कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेती करणे अशक्य होत चालले आहे. दर सुधारतील या आशेवर पुन्हा कांदा लागवड केली, पण कांदा पिकामुळेच शेती तोट्यात जात आहे. - तेजस घोलप, कांदा उत्पादक शेतकरी

कांदा हे आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कांदा पिकवून कर्ज वाढत आहे. एवढा खर्च करूनही बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. - तुषार घोलप, शेतकरी

कांद्याच्या भावाबाबत दरवर्षी असलेली अनिश्चितता शेतीचे नियोजनच उद्ध्वस्त करत आहे. एकरी लाख रुपये खर्च करून कांदा पिकवायचा आणि बाजारात १२-१५ रुपये किलो भाव घ्यायचा, हा सरळ अन्याय आहे. - प्रीतम डुंबरे, शेतकरी

अधिक वाचा: शासनाने बिगरशेती एनए परवानगी देण्याचे कलेक्टरचे अधिकार काढले; आता कोण देणार परवानगी?

English
हिंदी सारांश
Web Title : Onion Farmers Face Ruin: Lakhs in Costs, Just Rupees Per KG

Web Summary : Onion farmers in Junnar face severe financial crisis. Production costs exceed ₹1 lakh per acre, but prices plummet to ₹12-16/kg. Reduced yields due to weather further exacerbate losses, demanding government intervention for support and stable export policies.
टॅग्स :कांदाशेतकरीशेतीपीक व्यवस्थापनपीकजुन्नरपुणेबाजारमार्केट यार्डलागवड, मशागतसरकारखते