कडेगाव : पावसाळा ओसरताच ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या नजरेत एकच प्रश्न होता 'आवर्तन कधी सुरू होणार?' या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
ताकारी सिंचन योजनेचे रब्बी हंगामातील पहिले आवर्तन १ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रज्ञा पाटील यांनी दिली.
यंदा पाऊस समाधानकारक नसला तरी काही प्रमाणात चांगला झाल्यामुळे शेतकऱ्यांची पिके तग धरून उभी आहेत. पाणी टंचाई जाणवू लागली आहे.
नोव्हेंबरमध्येच आवर्तन सुरू व्हावे, अशी मागणी होत होती. पाणीसाठा नसलेले डोंगराळ भाग तसेच विहिरी तळाला गेलेले परिसर यांमधून आवर्तनाच्या तातडीच्या मागण्या होत होत्या.
सोनहिरा परिसरासह संपूर्ण कडेगाव तालुक्यातील शेतकरी 'ताकारी योजना कधी सुरू होणार?' या प्रश्नावर चर्चा करत असताना पाटबंधारे विभागाकडून आलेली माहिती शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरली आहे.
आवर्तन सुरू करण्यापूर्वी तांत्रिक बाबींची पूर्तता केली जात असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.
अधिक वाचा: तोडणी-वाहतूक खर्च वजा जाता ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या हातात यंदा किती रुपये येणार?
