दीपक देशमुख
सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम जोमात सुरू झाला असला तरी दराबाबत मात्र मनमानी सुरू असून, अद्यापही सहा साखर कारखान्यांनी दर जाहीर केलेला नाही.
विशेष म्हणजे, हे कारखाने मंत्री आणि आजी-माजी खासदारांचे आहेत तसेच उताऱ्याबाबतही शेतकऱ्यांकडून तक्रारी असून थर्ड पार्टी ऑडिटची मागणी करण्यात येत आहे. साखर जिल्ह्यात १७ कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे.
मात्र, साखरेचा उतारा गेल्या तीन वर्षांपासून घटू लागला आहे. त्याच्या थर्ड पार्टी ऑडिटची मागणी होत आहे. मागील साखर उताऱ्यावर यावर्षीचा एफआरपी ठरत असल्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी दर मिळत आहे.
यंदा १०.२५ बेस रिकव्हरी गृहित धरून ३,५५० एफआरपी निश्चित केली आहे. परंतु, दरांबाबत अद्यापही कारखान्यांकडून मनमानी सुरू आहे. सहा साखर कारखान्यांनी अद्यापही दर जाहीर केलेला नाही.
त्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊसतोड झाल्यानंतर कारखाने देईल तो दर सभासदांना घ्यावा लागू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर दर जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.
या १० कारखान्यांकडून दर जाहीर
◼️ जिल्ह्यात कृष्णा, जयवंत शुगर्स, रयत-अथणी, सह्याद्री, जरंडेश्वर, शिवनेरी, अजिंक्यतारा यांनी ३५०० रुपये.
◼️ माण-खटाव, ग्रीन गोपूज, वर्धन अॅग्रो ३३०० रुपये.
◼️ दत्त इंडिया (साखरवाडी) ३४०० रुपये.
◼️ पाटणच्या देसाई कारखान्याने ३००० दर जाहीर केला आहे.
दर न जाहीर करणारे कारखाने
◼️ प्रतापगड, किसनवीर, खंडाळा, स्वराज, शरयू, श्रीराम या सहा कारखान्यांनी अजूनही दर जाहीर करण्याची तसदी घेतलेली नाही.
◼️ विशेष म्हणजे यापैकी बहुतेक कारखान्यांचा ताबा मंत्री, आजी माजी खासदारांकडे आहे.
विलंब व्याजावरही मौन
उसाचे बिल १५ दिवसांत न दिल्यास वार्षिक १५ टक्के व्याजासह रक्कम देणे बंधनकारक आहे. पण, दरच नसेल तर बिल व व्याजाचा हिशेब कोण करणार? असा सवालही उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात ३६.४९ लाख मेट्रिक टन गाळप
अथणी शुगर्स: १,९५,५१०
शरयू: २,७१,२७०
जयवंत शुगर्स: २,७०,३९१
स्वराज्य: २,८४,३७७
प्रतापगड: ७४,५८०
अजिंक्यतारा: १,९७,९१०
कृष्णा: ५,४५,९७९
किसनवीर: १,८७,७९०
श्रीराम: १,८७,४७२
खंडाळा: १,१५,०३०
दत्त इंडिया: ३,४२,८२०
शिवनेरी: २,८१,४३०
सह्याद्री: २,५४,७००
खटाव माण: २,३१,६६५
देसाई कारखाना पाटण: २०,९८५
ग्रीन पॉवर शुगर: १,१७,४३०
एकूण: ३६,४९,३३९
कायदेमंडळात बसणारेच कायदे मोडत असून, नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना न्याय देत नाहीत. दुसरीकडे १७ नोव्हेंबरच्या बैठकीत दर न जाहीर करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता; पण आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
अधिक वाचा: सोलापूर जिल्ह्यातील 'या' सात साखर कारखान्यांनी पहिल्या १० दिवसांचे ऊस बिल केले जमा
