सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथील ओंकार शुगर युनिट नं.५ आणि रुद्देवाडी येथील मातोश्री लक्ष्मी शुगर युनिट नं. १५ या दोन्ही कारखान्यांचा यंदाच्या गळीत हंगामातील उसासाठी प्रतिटन ३००० रुपये दर जाहीर करण्यात आला आहे.
रुद्धेवाडी (अक्कलकोट) येथील मातोश्री लक्ष्मी शुगर हा कारखाना साखर उद्योगातील बाबूराव बोत्रे पाटील यांच्या ओंकार ग्रुपच्या व्यवस्थापनाखाली चालवला जाणार आहे. लवकरच या कारखान्याचे नियमित गाळप सुरू होणार आहे.
तडवळ येथील ओंकार शुगरसह मातोश्री लक्ष्मी शुगर या दोन्ही साखर कारखान्यांना यंदाच्या गळीत हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिटन ३००० रुपये दर दिला जाणार असल्याची माहिती ओंकार ग्रुपचे जनरल मॅनेजर व्ही. एम. गायकवाड यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याकडून ऊस दर जाहीर केला जात नाही अशा तक्रारी शेतकऱ्याकडून येत आहेत.
याबाबत कारखानदार जिल्हा प्रशासनाला ही दाद देत नाहीत अशा स्थितीत ओंकार ग्रुपने अक्कलकोट तालुक्यातील दोन्ही साखर कारखान्यासाठी समान दर जाहीर करून आघाडी घेतली आहे.
त्यात मातोश्री लक्ष्मी शुगर हा साखर कारखाना आर्थिक अडचणीत होता. ओंकार ग्रुपने यंदाच्या गळीत हंगामात गाळप सुरू करण्याची पूर्ण तयारी केली आहे.
यंदाच्या गळीत हंगामासाठी गाळपास येणाऱ्या उसाचा दर प्रतिटन २९०० रु. पहिली उचल तर दिवाळीच्या दरम्यान दुसरा हप्ता १०० रु. प्रमाणे अदा केला जाणार आहे.
तसेच १ मार्चपासून गळीतास येणाऱ्या उसाला ३१०० रुपये, तर १ एप्रिल २६ पासून येणाऱ्या उसाला ३२०० रुपये प्रतिटन ऊस दर जाहीर करण्यात आला आहे.
दिवाळीत मोफत साखर
ओंकार शुगर ग्रुप शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करीत असून, मागील वर्षी ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीसाठी मोफत साखर वितरित करण्यात आली. यंदाही गळितास ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत साखर दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
अधिक वाचा: राज्यातील साखर कारखान्यांनी थकलेली उसाची बिले १५ टक्के व्याजासह द्यावीत; नाहीतर उग्र आंदोलन
