सोलापूर : अवघ्या १५ दिवसांनी राज्यातील साखर कारखाने सुरू होणार असताना जिल्ह्यातील पाच कारखान्यांकडे एफआरपीचे ३२ कोटी थकले आहेत. दरम्यान, शेजारच्या धाराशिव जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी मागील गाळपाची संपूर्ण रक्कम चुकती केली आहे.
येत्या एक नोव्हेंबरपासून राज्याचा ऊस गाळप हंगाम सुरू होणार आहे. अशातच दोन दिवसावर दिवाळी आली आहे. असे असले तरी मागील वर्षी गाळपाला आणलेल्या उसाचे जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी ३२ कोटी १४ लाख रुपये दिलेले नाहीत.
विशेष म्हणजे या साखर कारखान्यांनी यंदाच्या ऊस गाळपासाठी अर्ज केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकविले असताना शेजारच्या धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे संपूर्ण पैसे देऊन टाकले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील एकट्या सिद्धेश्वर साखर कारखान्यांकडे १८ कोटी, मातोश्री, जयहिंद या कारखान्यांकडे पाच कोटींपेक्षा अधिक रक्कम देणे आहे. गोकुळ व सिद्धनाथ शुगरही ऊस उत्पादकांचे देणे आहे.
मागील वर्षी १ कोटी ४ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप
मागील वर्षी जिल्ह्याचे ऊस गाळप एक कोटी चार लाख मेट्रिक टन झाले होते. २७७२ कोटी ६६ लाख रुपये ऊस उत्पादकांना दिले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ७६७ कोटी १८ लाख रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत.
अतिवृष्टीमुळेही संकट
दिवाळी दोन दिवसांवर आली असताना ऊस उत्पादकांचे पैसे दिले जात नाहीत. अतिवृष्टी व पुरामुळे यंदा शेती पिकांतून उत्पन्न हाती येण्याची शक्यता कमीच असताना मागील वर्षांत गाळप केलेल्या उसाचे पैसे कारखाने देण्यास तयार नाहीत.