इस्माईल जहागिरदार
वसमत : उसाला भाव जेमतेम मिळत असला तरी नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी या वर्षीही उस लागवडीला (Sugarcane Cultivation) पसंती दिली आहे. परंतु, मागणी करूनही भाव जेमतेमच मिळत असल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. (Sugarcane Cultivation)
कारखान्याच्या साखर रिकव्हरीवर उसाला दर मिळत असून मागीलवर्षी 'पूर्णा' ने सर्वाधिक दर दिला होता. महागाईच्या मानाने उसाला प्रतिटन २ हजार ७०० रुपये भाव कमीच आहे. त्यामुळे कमीत कमी ३ हजार रुपये टन तरी भाव द्यावा, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (Sugarcane Cultivation)
कळमनुरी तालुक्यातील इसापूर व औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर या दोन धरणांचे पाणी दरवर्षी वसमत तालुक्याला मिळते म्हणून वसमत तालुका पाणीदार तालुका म्हणून परिचित आहे.
मागच्या तीन-चार वर्षापासून उसाला २ हजार ७०० ते २ हजार ८०० रुपयेच भाव दिला जात आहे. त्यातही उसाचे पैसे वेळेवर मिळत नाहीत. तरीही या वर्षी उसनवारी करीत शेतकऱ्यांनी उसाची लागवड (Sugarcane Cultivation) केली आहे.
डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांपासून उस लागवड करणे तालुक्यात सुरू झाली असून काही ठिकाणी उसाचे फडही तयार झाले आहेत. तालुक्यातील कुरुंदा, गिरगाव, किन्होळा, कवठा, पार्टी (बु) या शेतशिवारात शेतकऱ्यांनी ऊस लागवड (Sugarcane Cultivation) करून पाणी देणे सुरू केले आहे.
हळद पिकानंतर अधिकचा भाव देणारे पीक म्हणून उसाकडे पाहिले जाते. मागील वर्षी २३ हजार हेक्टरांवर शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली होती. परंतु यावर्षी उसाचे क्षेत्र २८ हजार हेक्टरांवर जाऊन पोहोचले आहे.
वसमत विभागात आजमितीस टोकाई सहकारी साखर कारखाना, पूर्णा कारखाना आणि जवळाबाजार येथील कपेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यरत आहे. हे तिन्ही साखर कारखाने शेतकऱ्यांसाठी जमेची बाजू असली तरी भाव देण्याच्या बाबतीत मात्र सारखेच आहेत.
अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन उसाला कमीत कमी ३ हजार रुपये तरी भाव द्यावा, अशी मागणी होत आहे. भाव समाधानकारक मिळाला तरच उसासाठी केलेला लागवड खर्च निघून शकतो, असे शेतकऱ्यांचे मत आहे. परंतु अनेक वर्षापासून कोणीही याबाबत दखल घेताना दिसत नाही. (Sugarcane Cultivation)
पाणीपाळीत नियमितता ठेवावी
उन्हाळी हंगाम सुरु झाल्यापासून इसापूर व सिद्धेश्वर धरण प्रशासनाने कालव्याद्वारे पाणी देणे सुरु केले आहे. आजपर्यंत तरी पाणीपाळी कमी केली नाही. यापुढेही उस व उन्हाळी पिकांसाठी पाणीपाळीत खंड पडू देऊ नये, अशी विनंती वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
ऊस घ्या आणि पैसे वेळेवर द्या
उसाचे पैसे वेळेवर मिळतात हे पाहून शेतकरी ऊस लागवड करतात. परंतु काही कारखाने वेळेवर पैसे देत नाहीत. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. कित्येक वेळेस कारखान्याच्या चकराही माराव्या लागतात. उसाला कमीत कमी ३ हजार रुपये तरी भाव देणे गरजेचे आहे. - श्रीराम इंगोले, शेतकरी
या वर्षी हळदीला १२ ते १३ हजार रुपये भाव मिळत आहे. हळदीपेक्षा उसाची निगराणी अधिक करावी लागते. तेव्हा शासनाने उसाला तीन ते साडेतीन हजार रुपये क्विंटल भाव द्यावा. - बालाजी दळवी, शेतकरी
वसमत तालुक्यात सिद्धेश्वर व इसापूर या दोन धरणांचे पाणी भरपूर प्रमाणात मिळते. त्यामुळे उसाचे क्षेत्र यावर्षी गेल्यावर्षीपेक्षा ५ हजार हेक्टरने वाढले गेले आहे. उसाला कोणत्या वेळी पाणी देत राहावे, फवारणी कशी करावी, खत कोणते टाकावा, यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा. - सुनील भिसे, तालुका कृषी अधिकारी.