सांगली जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांपैकी १६ कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. या कारखान्यांनी गेल्या १५ दिवसांत नऊ लाखांवर उसाचे गाळप करून आठ लाख ३१ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
दरम्यान, ऊस दराची कोंडी न फुटताच कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शेतकरी संघटनांनी मात्र सध्या तरी संयमाची भूमिका घेतली आहे.
जिल्ह्यात सहकारी आणि खासगी असे १९ साखर कारखाने आहेत, यापैकी आटपाडीचा माणगंगा, कवठेमहांकाळचा महांकाली आणि तासगाव तालुक्यातील तुरचीमधील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम अद्याप सुरू झाले नाहीत. उर्वरित राजारामबापू साखराळे (ता. वाळवा) येथील कारखान्याने दोन दिवसापूर्वी गळीत हंगाम सुरू केला आहे.
वाटेगाव (ता. वाळवा), तिपेहळ्ळी (ता. जत) आणि सर्वोदय (ता. वाळवा) येथील राजारामबापू युनिट सुरू झाले आहे. या कारखान्यांनी गाळपात आघाडी घेतली आहे. विश्वासराव नाईक, हुतात्मा, क्रांती, दालमिया, दत्त इंडिया-वसंतदादा, सोनहिरा कारखान्यानेही गळीत हंगाम सुरू करीत सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे.
सर्व कारखान्यांनी गळीत हंगामात आघाडी घेतली असली तरी ऊस दराची कोंडी फुटलेली नाही. शेतकरी संघटनांनी सध्या तरी संयमाची भूमिका घेतली आहे. यामुळे ऊस दराबद्दल निर्णय होणार की नाही, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.
दरवर्षी कारखाना सुरू होण्यापूर्वी ऊसदराची कॉडी फुटत असते, मात्र यंदा कारखाने सुरू होऊन १५ दिवस झाले मात्र अजूनही ऊस दर जाहीर केला नाही.
साखर उतारा जेमतेमच
साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होऊन पंधरा दिवस तर काहींना तीन ते चार दिवसच झाले आहेत. यामुळे साखर कारखान्यांचा उतारा अद्याप वाढलेला नाही. सर्वाधिक १०.८१ टक्के साखर उतारा आरग ता. मिरज येथील मोहनराव शिंदे तर सर्वात कमी ७.७३ टक्के साखर उतारा बामणी ता. खानापूर येथील उदगिरी शुगर साखर कारखान्याचा आहे. बहुतांशी कारखान्यांचा उतारा साडेदहा टक्केपेक्षा कमीच आहे.
जिल्ह्यातील कारखान्यांची गाळप स्थिती
कारखाना | ऊस गाळप (टन) | साखर (क्विंटल) |
दत्त इंडिया-सांगली | १२८००० | १२७१०० |
राजारामबापू-साखराळे | ६००० | ४५०० |
विश्वास-चिखली | ३२७४० | २८५५० |
हुतात्मा-वाळवा | ५६२९० | ५४१७५ |
राजारामबापू-वाटेगाव | २५७७० | २०१०० |
राजारामबापू-जत | ३४४१० | २९५०० |
सोनहिरा-वांगी | ९६६८० | ६७१०० |
क्रांती-कुंडल | १३९९७० | ८६९ |
राजारामबापू-कारंदवाडी | १५७९० | २४४६५ |
मोहनराव शिंदे-आरग | ७२८१० | ३४३०० |
दालमिया-करंगुळी | ३७०२० | ८११०० |
यशवंत शुगर-नागेवाडी | २५४१० | ८७९० |
रायगाव शुगर-डोंगराई | १२३० | १३१७०० |
उदगिरी शुगर-बामणी | ९१३९६ | ७३५९० |
सद्गुरु श्री श्री-राजेवाडी | ००० | ००० |
श्रीपती शुगर-डफळापूर | ००० | ००० |
एकूण | ८२३००० | ७३१००० |
अधिक वाचा: Sugarcane FRP 2024-25 : यंदाचा ऊस दर ठरणार; साखर आयुक्तांबरोबर बैठक होणार