कोल्हापूर : कर्नाटकातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्याने सीमाभागातील कारखान्यांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
पाडव्याला गव्हाणीत मोळी टाकून रविवार (दि. २६) पासून हंगाम सुरू करण्याची तयारी दिसत आहे. राज्य सरकारने सीमाभागातील कारखान्यांना हंगाम सुरू करण्याबाबत लवचिकता दिली आहे.
यंदा जिल्ह्यात १ लाख ९६ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. त्यामुळे यंदा उसाचे उत्पादन गेल्या हंगामापेक्षा अधिक होईल, असा अंदाज होता.
मात्र, मे महिन्यापासून पाऊस सुरू झाला, त्यात जून महिन्यात रासायनिक खताचा डोसही पिकांना देता आला नसल्याने उसाची वाढ दबकतच झाली.
सप्टेंबर महिन्यात उसाची झपाट्याने वाढ होते, पण कालावधीत एकसारखा पाऊस राहिल्याने वाढ खुंटली आहे. कर्नाटकातील कारखाने सुरू झाल्याने सीमाभागातील उसाची पळवापळवी होऊ शकते.
त्याचा फटका दत्त शिरोळ, गुरुदत्त, पंचगंगा, शाहू कागल, मंडलीक हमीदवाडा, संताजी घोरपडे, 'अर्थव-दौलत' या कारखान्यांना बसतो.
त्यामुळे या कारखान्यांच्या पातळीवर आता हालचाली गतिमान झाल्या आहेत. दिवाळी पाडव्याला गव्हाणीत मोळी टाकून हंगामाला सुरुवात केली जाऊ शकते.
दिवाळीनंतर ऊसतोडणी मजूर कारखाना कार्यस्थळावर येण्यास सुरुवात होणार आहे. साधारणता शुक्रवारपासून मजूर आले तर रविवारपासून हंगामाला सुरुवात होऊ शकते. त्यादृष्टीने कारखान्यांनी तयारी केली आहे.
असा उपलब्ध होऊ शकतो ऊस
एकूण उसाचे क्षेत्र : १ लाख ९६ हजार हेक्टर
सरासरी उतारा : हेक्टरी ८५ टन
गाळपासाठी
उपलब्ध होणारा ऊस : १ कोटी ६६ लाख टन
गुऱ्हाळघरासह इतर विल्हेवाट : २२ लाख टन
साखर कारखान्यांसाठी उपलब्ध होणारा ऊस : १ कोटी ४४ लाख टन
ऊस पुरणार का?
जिल्ह्यातील कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवली असून दिवसाला सुमारे १.२८ लाख टनाचे गाळप होते. उपलब्ध ऊस पाहता सरासरी १२० दिवस हंगाम चालू शकतो.
कर्नाटकात कारखाने सुरू झाल्यानंतर सीमाभागातील कारखान्यांना हंगाम सुरू करण्याची लवचिकता महाराष्ट्र सरकारने दिली आहे. तेथील कारखाने वेळेत सुरू झाले नाहीतर त्याचा गाळपावर परिणाम होतो. यंदा उसाचे क्षेत्र जास्त दिसत असले तरी उतारा अपेक्षित भेटेल असे आताच सांगता येणार नाही. - पी. जी. मेढे, साखर उद्योगाचे अभ्यासक
अधिक वाचा: शेतकऱ्यांनो गडबड नको; यंदा ऊस ताेडीसाठी खुशाली, एन्ट्री अन् जेवण या कुप्रथांचे कांडके पाडायची संधी