सोलापूर : राज्यातील साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची वेळोवेळी तपासणी करावी, अशी शेतकरी संघटनांची मागणी अनेक वर्षांपासून आहे.
अलीकडच्या काळात हंगाम सुरू झाला की, कारखान्यांना वैधमापन विभागाकडून प्रमाणपत्रांचे वाटप केल्याच्या बातम्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांची १५ वर्षापासून साखर कारखान्याच्या वजनकाट्यांची वेळोवेळी तपासणी करावी. ही तपासणी कारखान्याला अचानक भेट देऊन करण्याची मागणी आहे. त्यांच्या या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत आहे.
साखर आयुक्तालयाच्या बैठकांमध्ये याच विषयावर राजू शेट्टी आक्रमक पवित्रा घेत असले, तरी साखर आयुक्तांनी त्याची गंभीरपणे दखल घेतल्याचे दिसले नव्हते.
यंदाचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर अनेक साखर कारखाने आपल्या कारखान्याचे वजनकाटे योग्य असल्याचे प्रमाणपत्र वैधमापन विभागाकडून मिळाल्याचे जाहीर करतात.
ऊस उत्पादकांना त्यावर विश्वास ठेवावाच लागतो. याबाबत साखर आयुक्तांना थेट विचारणा केली असता, हंगाम सुरू झाल्यापासून कुठेही तपासणी केली नसल्याचे सांगण्यात आले.
विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना साताऱ्याच्या वैधमापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वजनकाटे योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिल्याची बातमी संघटनेने साखर आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी त्यांनी अशी भरारी पथके नियुक्त केलीच नसल्याचे स्पष्ट केले.
साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी संबंधित अधिकाऱ्याला संघटनेच्या पदाधिकाऱ्यासमोरच फोन लावला. या अधिकाऱ्यांना कडक शब्दात झापले. यातील फोलपणा लक्षात आल्याने साखर आयुक्तांनी प्रकरण गांभीर्याने घेणार असल्याचे सांगितले.
वजन कराल तर वाहन बाहेर
ज्या साखर कारखान्यातील वजनकाटे सदोष असल्याचा संशय शेतकऱ्यांना येतो, अशावेळी ते खासगी वजन काट्यावर वाहनाचे वजन करतात. ही बाब कारखानदारांना लगेच कळते आणि सदरचे वाहन कारखान्याबाहेर थांबवले जाते. सोलापूर जिल्ह्यातील काही कारखान्यांनी हा प्रकार केल्याच्या घटना चर्चेत आहेत.
कारखान्यांचे वजनकाटे निर्दोष असले पाहिजेत. संगणकीय वजनकाटे असल्याने त्याच्या तपासणीसाठी नियुक्त केलेल्या भरारी पथकात आयटी इंजिनिअर असले पाहिजेत. सर्वच वजनकाटे साखर आयुक्तालयाशी जोडलेले असावेत. - विजय रणदिवे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सोलापूर जिल्हा
अधिक वाचा: उसातील सोयाबीनच्या आंतरपिकाने केला चमत्कार; ३२ गुंठ्यांत साडेसोळा क्विंटल अन् ९० हजारांची कमाई
