सांगली : जिल्ह्यात दिवसेंदिवस फळबागांचे क्षेत्र वाढत आहे. विशेष म्हणजे केशर आंबा लागवड करण्याकडे ही शेतकऱ्यांचा कल जास्त असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात जवळपास दीड हजार हेक्टरवर आंबा झाडाची लागवड झाली आहे. यामध्ये जत, आटपाडी आणि मिरज तालुक्यात आंबा लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र आहे.
शेटफळे (ता. आटपाडी) येथील संतोष ननवरे यांनी ५०० झाडांची लागवड केल्यानंतर सध्या फळधारणा सुरु झाली आहे. आंबा पिकातून पाच लाख रुपयांचे उत्पादन शेतकऱ्याच्या पदरात पडले आहे.
सोयाबीन, भाजीपाला पिकांना योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. म्हणूनच शेतकरी फळपिकांकडे वळताना दिसत आहे.
जिल्ह्यात जवळपास दीड हजार हेक्टरवर आंबा लागवड झाली आहे. काही शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर ही केशर आंबा लागवड केली आहे. सध्या आंब्यास दरही चांगला मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी केशर आंबा फायदेशीर ठरत आहे.
जिल्ह्यात एकूण १५०० हेक्टरपर्यंत आंबा लागवड
जिल्ह्यात कृषी विभागाकडील विविध योजनांमधून फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यास जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळेच जिल्ह्यात सध्या १ हजार ५०० हेक्टरपर्यंत आंबा लागवडीचे क्षेत्र झाले आहे.
केशर आंब्यावर भर; फळाला हवामान पोषक
केशर आंबा लागवडीसाठी जिल्ह्यातील हवामान पोषक आहे. म्हणूनच जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, मिरज, तासगाव, कडेगाव तालुक्यात केशर आंबा लागवड करण्यावर शेतकरी जास्त भर देत आहेत.
कृषीकडून मार्गदर्शन
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना फळपिक लागवडीसाठी मोफत मार्गदर्शन केले. त्याचा फायदा आंबा उत्पादन घेण्यासाठी झाला आहे, असे शेतकरी सांगत आहेत.
२०१२ मध्ये ६ बाय ५ मीटर अंतरावर ५ एकरांवर केसर लागवड केली आहे. त्यात ५०० झाडे आहेत. लागवडीनंतर पाचव्या वर्षी आंबा उत्पादन घेण्यास सुरुवात केली. पहिली तीन वर्षे कमी आंबा उत्पादन मिळाले. मात्र हळूहळू आंबा उत्पादनात वाढ होत गेली. मागील तीन वर्षांत एकरी सरासरी २० ते २८ टनांपर्यंत आंबा उत्पादन मिळाले आहे. - महेश शिंदे, प्रगतशील शेतकरी
अधिक वाचा: पुण्यातली नोकरी सोडली आणि केशर आंब्याची शेती केली; वर्षाला ५ लाख रुपयांची कमाई झाली