बापू सोळुंके
मराठवाडयातील सर्वच तालुक्यांतील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. मराठवाड्यात सोयाबीन आणि कापसाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी या दोन्ही पिकांच्या लागवडीपासून आजपर्यंत केलेला सुमारे दहा हजार कोटींचा खर्च पाण्यात गेला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा वगळता उर्वरित सहा जिल्ह्यांत शेतकऱ्यांची पहिली पसंती सोयाबीनला आहे. मराठवाड्यातील तब्बल २५ लाख ३९ हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली होती. शेतीमशागत, पेरणी बियाणे, खते आणि औषध फवारणी यावर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी प्रति हेक्टरी ३२ ते ३५ हजार रुपये खर्च केला आहे.
मराठवाड्यातील सोयाबीन पिकाचे शंभर टक्के नुकसान झाल्याचा कृषी विभागाने अंदाज वर्तविला आहे. यावरून शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीवर आजपर्यंत खर्च केलेले तब्बल ७ हजार ५०० कोटी रुपये पाण्यात गेले. मराठवाड्यातील १२ लाख ५४ हजार हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली आहे.
कृषी अभ्यासकांच्या मते कपाशी लागवडीपासून आजपर्यंत प्रती हेक्टरी ३५ ते ४० हजार रुपये खर्च शेतकऱ्यांना करावा लागला आहे. अतिवृष्टीमुळे ५० टक्के सरकी पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या अंदाजानुसार सुमारे सहा लाख हेक्टरवरील सरकी पिकांवर लावण्यात आलेले सुमारे २ हजार ५१२ कोटी रुपये पाण्यात गेले आहेत.
क्षेत्र आणि खर्च
२५,३९,००० हेक्टर - सोयाबीन पेरणी
७,५०० कोटी रुपये - सोयाबीन लागवडीवरील खर्च
१२,५४,००० हेक्टर - कापूस लागवड
२,५१२ - कोटी रुपये कापसावरील खर्च
अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे सोयाबीनची माती झाली, तर कपाशीच्या अर्ध्यावर पिकांचे नुकसान झाले आहे. पीक नुकसानीचे पंचनामे सध्या सुरू आहेत. शासनाकडून शेतकऱ्यांना लवकरच नुकसानभरपाई मिळणार आहे. शेतकऱ्यांनी संयम धरावा. - प्रकाश देशमुख, प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर.
मराठवाड्यात सोयाबीनचे क्षेत्र अधिक आहे. सोयाबीन 66 पेरणी, बियाणे, खते आणि कीटकनाशक फवारणी इ. वर हेक्टरी ३२ हजार ते ३५ हजार रुपये खर्च येतो. मका पिकाच्या उत्पादनासाठी प्रति हेक्टरी २२ हजार ते २५ हजार रु. खर्च शेतकऱ्यांनी केला आहे. कापूस उत्पादकांचा प्रति हेक्टरी ३५ ते ४० हजार रुपये खर्च झाला आहे. नैसर्गिक आपत्तीत मराठवाड्यातील सर्वच पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळेल. - सुनील चव्हाण, निवृत्त कृषी आयुक्त.