सोलापूर : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ या गाळप हंगामासाठी प्रति मेट्रिक टन ३००१ रुपया दर निश्चित केला आहे.
परिसरातील इतर साखर कारखान्यांच्या तुलनेत अधिक दर देण्याची परंपरा यंदाही कारखान्याने कायम राखल्याचे कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी सांगितले.
ऊस दराची रक्कम तीन हप्त्यांमध्ये अदा करण्यात येणार आहे. त्यामध्ये पहिला हप्ता प्रति टन २५०० रुपये तत्काळ अदा करण्यात येणार असून, दुसरा हप्ता प्रति टन ३०० रुपये जून महिन्यात दिला जाईल.
उर्वरित २०१ रुपयाचा अंतिम हप्ता दिवाळीच्या सुमारास अदा करण्यात येईल, असेही काडादी यांनी सांगितले. मागील ६-७ वर्षापासून कारखान्याला भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणींमुळे संपूर्ण ऊस दराची रक्कम एकाच वेळी अदा करणे शक्य झालेले नाही.
त्यामुळे जानेवारीनंतर ऊस गाळपास देणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काही हप्त्यांच्या देयकांमध्ये विलंब होतो, हे यापूर्वी अनुभवास आले आहे. ही बाब लक्षात घेऊन पुढील नियोजन करण्यात आले आहे, असे काडादी यांनी सांगितले.
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापन सर्व भागधारक, सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठामपणे आश्वासित करतो की, जाहीर केलेले सर्व हप्ते निश्चित कालमर्यादेत अदा करण्यात येतील. - धर्मराज काडादी, संचालक, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना
अधिक वाचा: ओंकार साखर कारखान्याचा ऊस दर जाहीर; टप्याटप्याने दरात किती रुपयांची वाढ मिळणार?
