नासीर कबीर
इराण-इस्रायल व अमेरिका युद्धाचा करमाळ्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
केळीची निर्यात ठप्प झाल्याने केळी उत्पादक शेतकरी काढणीला आलेली केळी कापून चक्क जनावरांना चारा म्हणून खाऊ घालत आहे.
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर उमटू लागले आहेत.
करमाळा तालुक्यातील पांडे येथील शेतकरी संपतराव दिगंबर कुंभार या हतबल शेतकऱ्याने केळीचा युद्धजन्य परिस्थितीमुळे सौदा होत नाहीत.
यामुळे कापणीला आलेल्या केळीच्या बागेकडे व्यापारी फिरकत नसल्याने व मिळणारा दर परवडणारा नसल्याने आपल्या शेतातील केळी कापून जनावरांना खाऊ घातली.
आखाती देशात भडकलेल्या युद्धामुळे आखाती देशात होणारी केळीची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी, करमाळा तालुक्यातील केळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
उत्पादन खर्चही निघत नसल्याने हतबल शेतकऱ्याने चक्क आपल्या उभ्या केळीची कापणी करून ती जनावरांना चारा म्हणून खाऊ घालण्याची वेळ आली आहे.
शेतकरी हवालदिल
◼️ फेब्रुवारीमध्ये १० ते १५ रुपये किलोने जाणारी केळी आता ४ ते ५ रुपयांवर आली आहे.
◼️ काढणी, कापणी आणि वाहतुकीचा खर्चही या दरातून फिटत नाही.
◼️ बागेवर लाखो रुपये खर्च करूनही हाती काहीच लागत नसल्याने केळी उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.
निर्यात थांबल्याने दर कोसळले
◼️ करमाळा तालुक्यातील केळीला इराण, इराक, दुबई आणि ओमान यांसारख्या आखाती देशांत मोठी मागणी असते.
◼️ मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय जलमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
◼️ जहाजांचे भाडे वाढल्याने आणि सुरक्षेच्या कारणास्तव व्यापाऱ्यांनी निर्यात थांबविल्याने याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवर झाला आहे.
अधिक वाचा: युरियाच्या पोत्याचा आकार कमी होणार; आता किती किलोचे येणार पोते? काय राहणार किंमत?
