राम मगदूम
गडहिंग्लज : नांदेड जिल्ह्यातील रोही-पिंपळगाव येथील काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 'संकेश्वरी मिरची' या वाणाचे उत्पादन घेतले आहे.
गडहिंग्लजपासून ६०० किलोमीटर दूरवर असणाऱ्या नांदेडमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यांच्याकडून २० क्विंटल मिरची गडहिंग्लज बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी येणार आहे.
गेल्या वर्षी नांदेडच्या काही शेतकऱ्यांनी गडहिंग्लजमध्ये येऊन जवारी संकेश्वरी मिरचीची माहिती घेतली. येथील अडत व्यापारी रोहित मांडेकर यांच्याकडून बियाणे मागवून घेतले.
नांदेडमधील रोपवाटिकेत रोपे तयार करून घेऊन ऑगस्टमध्ये त्याची लागवड केली. ४ फूट उंचीच्या झाडांना दिवाळीनंतर चांगले उत्पादन सुरू झाले आहे. पहिल्याच तोडीला ८ शेतकऱ्यांची मिळून २० क्विंटल मिरची उत्पादित झाली आहे.
नांदेडमध्ये 'मेडिकल' या वाणाच्या मिरचीचे उत्पादन घेतले जाते. बियाणे देतानाच मिरचीच्या खरेदीचा भावही ठरवला जातो.
गतवर्षी प्रतिकिलो ३२० रुपये दर मिळाला; परंतु 'मेडिकल'च्या लागवडीचा खर्च अधिक असल्याने शेतकऱ्यांनी 'संकेश्वरी मिरचीचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. भविष्यात नांदेडमध्ये मिरचीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
एकरी ८ क्विंटल उत्पादन!
संकेश्वर मिरची चवळीसारखी लांब, लालभडक व तिखट असल्याने मसाल्यामध्ये त्याचा वापर केला जातो. त्यामुळे त्याला नेहमीच मोठी मागणी असून, दरही चांगला मिळतो. म्हणूनच नांदेडकरांनी हा प्रयोग केला आहे. यंदा एकरी किमान ८ क्विंटल उत्पादन मिळेल, असा त्यांचा अंदाज आहे.
यांनी केला प्रयोग यशस्वी
राम शिंदे, बालाजी शिंदे, गणेश सोनटक्के, आनंदा सोनटक्के, दिगंबर कोकणे, कांतराव सोनटक्के या जिद्दी शेतकऱ्यांनी संकेश्वरी मिरचीच्या उत्पादनाचा प्रयोग नांदेडमध्ये यशस्वी केला आहे.
वाहतूक परवडत नसतानाही
नांदेड ते गडहिंग्लज अंतर ६०० किलोमीटर आहे. त्यामुळे उत्पादित मिरची विक्रीसाठी गडहिंग्लजला आणणे परवडणारे नाही; परंतु अपरिचित वाण व त्याची गुणवत्ता माहीत नसल्यामुळे स्थानिक बाजारात त्याला योग्य भाव मिळणार नाही. म्हणून योग्य भाव आणि चार पैसे मिळतील या आशेनेच ते याच आठवड्यात आपली मिरची विकायला गडहिंग्लजला येणार आहेत.