दापोली: राज्यातील महाबळेश्वर स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, त्याच तोडीस तोड असणाऱ्या स्ट्रॉबेरीची शेतीकोकणचे मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या दापोली तालुक्यातील कोळथरे येथील साहिल पेठे यांनी तयार केली आहे.
कोकणातील लाल मातीतही चांगल्या प्रकारची गुणवत्ता असलेली स्ट्रॉबेरीची शेती होऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.
महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीपेक्षा अधिक गुणवत्ता असलेली स्ट्रॉबेरी कोकणातील लाल मातीत होऊ शकते, असा प्रयोग दापोली कोकण कृषी विद्यापीठाने यापूर्वीच केला आहे.
त्यापाठोपाठ कृषी पदवीधारक विद्यार्थी असलेल्या साहिल पेठे यांनी आपल्या शिक्षणाचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने स्ट्रॉबेरीची शेती केली आहे.
कमी शेतीत अधिक उत्पन्न घेण्याच्या दृष्टीने पेठे यांनी स्ट्रॉबेरीचा पर्याय निवडला आहे. त्यांच्या प्रयोगाला यशही आले आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी शेतीखालील क्षेत्र वाढवण्याचे त्यांनी ठरविले आहे.
कोकणातील लाल मातीत अधिक गुणधर्म असलेली उत्कृष्ट दर्जाची स्ट्रॉबेरीची शेती होऊ शकते याची खात्री झाल्याने पुढील वर्षापासून त्यांनी अन्य शेतकऱ्यांची जमीन भाडेतत्त्वावर घेऊन मोठ्या प्रमाणात लागवड करण्याचे ठरवले आहे.
या स्ट्रॉबेरीला महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीपेक्षा अधिक दर मिळत असल्याने कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होत आहे.
या शेतीसाठी त्यांचे वर्गमित्र निखिल भिलारे व गणेश पवार रोपे उपलब्ध करुन देत आहेत, तर, खरवते दहिवली येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य सुनीतकुमार पाटील, प्रा. प्रशांत पवार त्यांना मार्गदर्शन करत आहेत.
कृषी शिक्षणाचा उपयोग करून घेत कोकणातील लाल मातीत स्ट्रॉबेरी शेतीतून रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. पुढीलवर्षी स्थानिक शेतकऱ्यांना सोबत घेऊन स्ट्रॉबेरी शेतीचे क्षेत्र वाढवण्याचा मानस आहे. - साहिल पेठे, शेतकरी
अधिक वाचा: शेतीमध्ये पहिलेच पाऊल टाकत केली या विदेशी पिकाची लागवड; खर्च वजा जाता तीन लाखांचे उत्पन्न