मंगळवेढा : काही साखर कारखान्यांनी उसाच्या पहिल्या हप्त्याचा दर तीन हजार रुपये जाहीर केला असतानाही मंगळवेढा तालुक्यातील एकाही कारखान्याने दर जाहीर न केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता.
अखेर शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत युटोपीयन शुगर कारखान्याने पुढाकार घेत उसाच्या पहिल्या हप्त्याचा दर तीन हजार रुपये जाहीर करून मंगळवेढा तालुक्यातील ऊस दराची कोंडी फोडली आहे.
ऊस दरासाठी मंगळवारी आंदोलनासाठी गेलेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याच्या हाती युटोपीयन शुगर कारखाना प्रशासनाने पहिला हप्ता तीन हजार रुपये देण्याचा निर्णय लेखी पत्राद्वारे सुपुर्द केला.
हे पत्र हाती पडताच अवघ्या एका तासात भैरवनाथ शुगर कारखान्यानेही उसाला तीन हजार रुपये दर देण्याबाबतचे लेखी पत्र शेतकरी संघटनेकडे दिले.
जिल्ह्यात उसाच्या पहिल्या हप्त्यासाठी आंदोलनाचा भडका उडाला असून, सर्व शेतकरी संघटनांनी एकजूट करत 'आरपार'ची लढाई सुरू केली आहे.
जिल्ह्यातील कारखानदारांनी आपापसातील राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एकच दर जाहीर करण्याची 'गड्डी' केल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून करण्यात येत होता.
हा डाव ओळखून स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्यत कांती संघटनेसह विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आक्रमक आंदोलन छेडले.
युटोपीयन शुगस्वर स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना, स्वाभिमानीचे पदाधिकारी यांच्यासह असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.
उरले १० कारखाने..
मंगळवेढा तालुक्यातील युटोपियन व भैरवनाथ शुगरने तीन हजार रुपये पहिली उचल जाहीर केल्याने श्री संत दामाजी व अवताडे शुगरला दर जाहीर करावा लागणार आहे. किती दर द्यायचा हे मात्र तेथील व्यवस्थापनावर अवलंबून आहे. दर जाहीर न केलेले १० साखर कारखाने उरले आहेत.
युटोपीयन शुगर कारखान्याने पहिला हप्ता तीन हजार रुपये जाहीर करून शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि भावनांचा सन्मान केला आहे. आता आवताडे शुगर, दामाजी, जकराया तसेच जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांनी कोणताही विलंब न करता शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून तातडीने दर जाहीर करावा. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. - युवराज घुले जिल्हा संघटक, स्वाभिमानी शेतकरी संघटना
अधिक वाचा: अतिवृष्टीच्या पॅकेजमधील पिक विम्याचे १७,५०० रुपये सर्वच शेतकऱ्यांना मिळणार का? वाचा सविस्तर
