अवकाळी पावसाने मार्चमध्ये नाशिक जिल्ह्याला दिलेल्या तडाख्यामुळे तब्बल ६५ हजार शेतकऱ्यांच्या ४१ हजार हेक्टरवरील शेतपिकांची नासाडी झाली. जिल्ह्याच्या कृषी विभागाने पंचनामे पूर्ण करत शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची आर्थिक मदत मिळावी यासाठी ७३ कोटी ३४ लाखांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव लवकरच शासनाकडे रवाना करण्यात येणार असला तरी पुन्हा एकदा अवकाळीचे ढग जिल्ह्यावर दाटण्यास सुरुवात झाल्याने बळीराजासह प्रशासनदेखील चिंतेत आहे.
मागील महिन्यात व एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमधील सिन्नर, कळवण, निफाड, देवळा, दिंडोरी, येवला, नांदगाव, मालेगाव, चांदवड या तालुक्यांना गडगडाटी वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले होते. काही भागात गारपिटीचाही माराही शेतपिकांना बसल्याने जास्त हानी झाली होती. बेमोसमी पावामुळे बागायतीच्या ३६ हजार ६४१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान नोंदविण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील २५८ गावांमधील ५१ हजार ५४८ शेतकऱ्यांना अवकाळीचा तडाखा बसल्याने त्यांना हेक्टरी १७ हजार रुपयांप्रमाणे ६२ कोटी २९ लाख १० हजार रुपये आर्थिक मदतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील १५२ गावांमधील १४ हजार २०८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
यात द्राक्ष १९९ हेक्टर, डाळिंब ४,५८४ हेक्टर, आंबा २७ हेक्टर या फळपिकांचा समावेश आहे. बहुवार्षिक फळपिकांमध्ये ४९१४ हेक्टरवरील पिकांसाठी ११ कोटी ५ लाख ८४ हजार रुपयांची आर्थिक मदतीचा अहवाल कृषी अधीक्षक कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे.
अशी दिली जाते मदत
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोरडवाहू, बागायती आणि बहुवार्षिक फळपिके या क्षेत्रानुसार शासकीय मदत दिली जाते. कोरवाडवाहू क्षेत्रातील पिकांना ८५०० रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे, तर बागायती क्षेत्रासाठी १७ हजार रुपये प्रतिहेक्टर आणि फळपिकांना २२ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर मदत मिळते. यात नुकसानीचे प्रमाण ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असले तरच मदतीसाठी ग्राह्य धरण्यात येते.
शेतपिकांची हानी ... (हेक्टर)
- कांदा - ३४,१३६
- गहू - १,२३१
- भाजीपाला - १८९
- डाळिंब - ४,५८४
नुकसान दृष्टिक्षेपात...
- बाधित गावे - ४१०
- बाधित शेतकरी - ६५,७५६
- बाधित क्षेत्र - ४१,५५६ हेक्टर
