रब्बी २०२५-२६ हंगामासाठी अन्नधान्य पिके, वाणिज्यिक पिके व तेलबिया अंतर्गत पिक प्रात्यक्षिके या घटकासाठी शेतकरी गटांनी अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अन्नधान्य पिके व वाणिज्यिक पिके आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये खालील पिकांचा समावेश आहे.
गहू, कडधान्य, पौष्टिक तृणधान्य, ऊस, करडई, मोहरी व सूर्यफुल या पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान पोहचविण्यासाठी पीक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
पिक प्रात्यक्षिकांकरिता कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे दि. ३१ मार्च, २०२४ पूर्वी नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व कृषि क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांना लाभ देण्यात येणार आहे.
याकरिता गटाने प्राधिकृत केलेल्या सदस्याने महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा दि. ०२.०९.२०२५ पासून उपलब्ध आहे. गटांची निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्वावर करण्यात येणार आहे.
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करताना https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer या संकेतस्थळावर “बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक, औषधे आणि खते” या टाईल अंतर्गत शेतकरी गटांना अर्ज करता येतील.
शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार अर्ज करणाऱ्या व लाभ घेणाऱ्या गट सदस्यांचा फार्मर आयडी Farmer ID असणे आवश्यक आहे.
तरी जास्तीत जास्त शेतकरी गटांनी विविध पिकांच्या पिक प्रात्यक्षिके या घटकासाठी अर्ज करावेत व लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
अधिक वाचा: शेतरस्ते होणार आता कायमचे अतिक्रमणमुक्त; प्रत्येक रस्त्यासाठी मिळणार विशिष्ट नंबर