कोल्हापूर : ज्यांचे कृषिपंप प्रत्यक्षात ७.५ अश्वशक्ती किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेचे आढळतील त्यांच्या वीजभारात आवश्यक दुरुस्ती करून त्यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सुमारे १० हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. संबंधित कृषिपंपांच्या आवश्यक तांत्रिक बाबींची स्थळ पडताळणी आणि कृषिपंपांचे करंट तसेच एकूण प्रत्यक्ष भार याची प्रत्यक्ष तपासणी सर्व स्थानिक कार्यालयांकडून सुरू आहे.
वीजबिलात चुकीचा किंवा वाढीव भार नोंद झाल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित होते. आता या सर्व बिलांची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे.
याबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठीच्या सूचना महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांनी दिल्या आहेत.
कृषी ग्राहकांना वीज सवलत देत ५ वर्षांसाठी एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ पर्यंत "मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना" राबविण्यात येणार आहे.
कोल्हापूर सांगली जिल्ह्यामधील काही कृषी ग्राहकांकडून प्रत्यक्षात जागेवर कृषीपंप क्षमता ७.५ अश्वशक्ती किंवा त्यापेक्षा कमी वापर असलेल्या परंतु वीज देयकावर ७.५, ८, ८.५ ते ९.०० अश्वशक्ती असा भार उल्लेख असल्यामुळे या योजनेचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी महावितरणकडे आल्या होत्या.
या अनुषंगाने स्थानिक कार्यालयांना संबंधित कृषिपंपांची स्थळ तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती करण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार प्राप्त प्राथमिक अहवाल योग्य त्या माहितीसाठी मुख्य कार्यालयास सादर केला होता.
अधिक वाचा: नवीन गाळप हंगामाचे धोरण ठरले; यंदा गाळप होणाऱ्या उसासाठी कसा मिळणार दर?