Join us

Ranbhajya: पावसाळ्यात रानभाज्यांची जादू; चवीबरोबरच 'या' रानभाज्यांचा आरोग्यालाही मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 13:24 IST

Ranbhaji Health Benefits: सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या पावसाळ्यात आढळून येतात. अगदी सहज ओळखण्याजोग्या रानभाज्या आपणास वर्षाऋतूमध्ये आजूबाजूला आढळून येतात.

सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या पावसाळ्यात आढळून येतात. अगदी सहज ओळखण्याजोग्या रानभाज्या आपणास वर्षाऋतूमध्ये आजूबाजूला आढळून येतात. यामध्ये सर्वात जास्त आढळणारी भाजी म्हणजे टाकळा, याची भाजी पौष्टिक मानली जाते. रस्त्याच्या आजूबाजूला जेथे नजर फिरेल तेथे आपणास हिरव्यागार पानांचा टाकळा वाढलेला आढळून येतो.

टाकळ्याच्या पानांमध्ये जीवनसत्त्वांसोबत लोहसुद्धा काही प्रमाणात असते. त्वचा रोगांमध्ये सर्वश्रेष्ठ भाजी म्हणून टाकळा या जंगली भाजीकडे पाहिले जाते.

टाकळ्याचे पाने, खोड, मूळ, फुले, बीज यांचे वेगवेगळे उपयोग आहेत. बाजारात आदिवासी महिलांच्या माध्यमातून या भाज्या विक्रीसाठी आणल्या जात आहेत.

आरोग्यासाठी गुणकारी

◼️ टाकळ्याच्या रसाचा वापर वेगवेगळ्या अनुपानापरत्वे यकृताच्या आजारांवर केला जातो. टाकळ्याचा रस व चिंचेचा पाला यांचा रस भूक मंद झालेल्या रुग्णांना दिल्यास अल्पावधीत भूक वाढते.◼️ अळंबी किंवा मशरूम याच्याबद्दल अनेक किस्से आढळतात. काही मंडळी अळंब्यांना मांसाहारी म्हणून खाणे टाळतात; पण अळंबी ही एक प्रकारची भाजी आहे.◼️ अळंब्यांचे विविध प्रकारसुद्धा आढळतात. यामध्ये काही प्रकारची अळंबी ही विषारी असतात. या भूछत्रांमध्ये आतड्यांचा कर्करोग बरा करण्याची ताकद आहे.◼️ पेवग्याची भाजीसुद्धा बहुगुणकारी आहे. कॉलीची भाजी मधुमेही रुग्णांसाठी फार चांगली असते. रानभेंडीचे सूप अंगात ताकद येण्यासाठी घेतात. अमरकंद रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो.

विविध समस्यांसाठी ठरतेय गुणकारी

कपाळफोडी, भारंगी अनेक आजारांवर फार प्राचीन काळापासून वापरली जातात. भारंगी मधुमेहासह उच्च रक्तदाब, रक्तदोष, स्त्रियांच्या आजारांवर चिकित्सेकरिता वापरली जाते. पावसाळ्यात आढळणाऱ्या अनेक रानभाज्या आरोग्यविषयक समस्यांसाठी उपयुक्त आहेत.

'या' रानभाज्यांची आवक◼️ बांबूच्या कोवळ्या पानांची भाजी, अळूची भाजी, अळंबी, अमरकंद, कर्टोली, कुलू, कुरडू, दिंडा, रानभेंडी, शतावरी वगैरे पावसाळ्यामध्ये स्थानपरत्वे वाढणाऱ्या भाज्या वेगवेगळ्या असतात.◼️ जंगलातून, डोंगरदऱ्यातून चालताना अनेकदा भारंगी दिसून येते. मोठी पाने व त्याच्या कडेवर असलेले कात्रे व मध्यभागी तुऱ्यावर असलेली निळसर वर्णाची फुले ही भारंगीला आकर्षक बनवतात.

वेगवेगळे गुणधर्मया सर्व रानभाज्या पावसाळ्यात कोकणामध्ये आढळून येतात. सर्व रानभाज्यांचे आरोग्यदायी गुण आहेत. प्रत्येक भाजीचे गुणधर्मसुद्धा वेगवेगळे आहेत. मधुमेहासह चरबीचे विकार, वजन वाढणे, पोटाचे आजार, बद्धकोष्ठता याच्यासाठी टाकळ्याची भाजी बहुगुणी मानली जाते.

अधिक वाचा: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, पीक कर्ज मर्यादेमध्ये मोठे बदल; आता मिळणार वाढीव कर्ज?

टॅग्स :भाज्याशेतीशेतकरीजंगलपर्यावरणनिसर्गआरोग्यहेल्थ टिप्सबाजार