संतोष जाधव
तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील डोंगरदऱ्या, खोऱ्यांमध्ये यंदा रानभाज्या आणि रानमेव्यांनी आसमंत बहरला आहे.
कोणतीही शेती किंवा रासायनिक खतांचा वापर न करता निसर्गाच्या कुशीत उगवणाऱ्या या रानभाज्यांनी सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे.
जंगलात, शेतांच्या बांधावर, माळरानावर आणि झुडपांमध्ये या भाज्या विपुल प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. यंदा मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाल्याने रानभाज्यांचा हंगाम एक महिना अगोदरच बहरला आहे.
दरवर्षी भाद्रपद महिन्यात (ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला) रानभाज्यांचा हंगाम सुरू होतो, परंतु यंदा मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्याने हा हंगाम लवकरच बहरला आहे. यंदाचे पावसाळी वातावरण रानभाज्यांसाठी अतिशय पोषक ठरले आहे.
त्यामुळे माठ, चावाचा तेल, रुखाळ, कुर्डू, सायरधोड, कौदरीच्या कोंबाची, चिचुरडे, चैताचा बार, कोंबाळ तेरा, कर्दुल, शेऊळ, लोथी, सतरा, हळंदा, शेवळे, कोरड, शेवगा, तेरे, कुडाची फुले, घोळ, रताळ्याचे कोंब या भाज्या उपलब्ध झाल्या आहेत.
तसेच टेंभरण, भोपा, बौंडारा, चायवळ, मोखारुखवळ, भारंगी, चिचार्डी, फांदी, शेवाळ, चायाची, सापकांदा (दिवा), म्हैसवेल अशा अनेक दुर्मिळ रानभाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत.
रानभाज्या केवळ चविष्टच नसतात, तर त्यांच्यात अनेक औषधी गुणधर्मही आहेत. मधुमेह, पोटदुखी, खोकला, सर्दी, ताप, दमा आणि त्वचा विकारांवर या भाज्या उपयुक्त ठरतात.
रानभाज्यांचे महोत्सव
पावसाळ्यात या भाज्या नैसर्गिकरित्या उगवतात आणि स्थानिक आदिवासी समुदाय या भाज्या गोळा करून खातात, तसेच बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात. या रानभाज्यांचे महत्व लक्षात घेऊन आदिवासी गावांमध्ये रानभाज्यांचे महोत्सवही आयोजित केले जातात.
स्थानिकांचे योगदान
आदिवासी समुदायाला वा रानभाज्यांची सखोल माहिती आहे. ते रानात फिरून या भाज्या गोळा करतात आणि त्यांचा आहारात समावेश करतात. यामुळे त्यांचे आरोग्य उत्तम राहते आणि निसर्गाशी त्यांचे नाते दृढ होते. काही ठिकाणी या भाज्या स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्या जातात, ज्यामुळे स्थानिकांना आर्थिक लाभही होतो.
बदलते महत्त्व
सध्या शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांमध्ये पौष्टिक आणि आरोग्यदायी आहाराचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळे पारंपरिक जीवनशैली आणि रानभाज्यांकडे लोकांचा कल वाढत आहे. शासनानेही रानभाज्यांचे महत्त्व ओळखून विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये उगवणाऱ्या या रानभाज्या केवळ स्थानिक आदिवासींसाठीच नव्हे, तर सर्वांसाठी पौष्टिकतेचा खजिना ठरत आहेत.
अधिक वाचा: आता शेतजमिनीचे जुने दस्त डिजिटल स्वाक्षरीसहीत मिळणार ऑनलाईन; वाचा सविस्तर