अहिल्यानगर : राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य ज्वारी पिकाच्या उत्पादकता वाढीसाठी व बियाणे बदलाचे महत्त्व लक्षात घेऊन सुधारित/संकरित वाणाच्या प्रसारासाठी प्रमाणित बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
यामुळे शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीचे बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयरोग, मधुमेह आणि पोटाच्या विकारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आहारात ज्वारी तृणधान्यापासून बनलेल्या पदार्थांचे महत्त्वही वाढू लागले आहे.
रब्बी ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणात जिरायती क्षेत्रावर केली जाते. सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ७५ टक्के पर्जन्यमान झाले आहे.
इतर पिकांच्या तुलनेत ज्वारीची पाण्याची गरज कमी असल्याने तसेच पशुधनासाठी गुणवत्तापूर्ण चारा उपलब्ध होत असल्याने शाश्वत पीक म्हणून ज्वारी पिकाखालील क्षेत्रामध्ये वाढ होत आहे.
सुधारित तंत्रज्ञानाने ज्वारीची लागवड केल्यास कोरडवाहू ज्वारीच्या हेक्टरला २० ते २५ क्विंटल, तर बागायती ज्वारीच्या ३० ते ३५ क्विंटल उत्पादनाची अपेक्षा करता येते. कोरडवाहू क्षेत्रात धान्यापेक्षा दुप्पट, तर बागायतीत अडीच ते तीनपट कडब्याचे उत्पादन मिळते.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत प्रमाणित बियाणे वितरण घटकातून ज्वारीच्या बियाण्याला वर्षांखालील शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३ हजार रुपये तर १० वर्षाबाहेरील शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १५०० रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
यासाठी शेतकऱ्यांचे ७/१२ उताऱ्याच्या आधारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल तसेच अॅग्रिस्टॅकवर नोंदणी असणे बंधनकारक आहे.
महाबीज/राष्ट्रीय बीज निगम/कृभको प्रमाणित बियाणे वितरण घटकांतर्गत आर्थिक सहाय्य प्रति शेतकरी किमान ०.२० हेक्टर ते कमाल १ हेक्टरपर्यंत देण्यात येईल.
या योजनेत कृषी विद्यापीठाने संशोधित केलेली वाण उपलब्ध होतील. या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.
अधिक वाचा: e Pik Pahani : ई-पीक पाहणीचे नवीन अपडेटेड मोबाईल अॅप वापरून कशी कराल पिकांची नोंद?