राजाराम लोंढे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात यंदा उसाचे क्षेत्रात वाढ झाली असली तरी सततचा पाऊस आणि पूरबाधित क्षेत्राचा विचार केल्यास गाळपावर मर्यादा येणार आहेत.
यंदा १ लाख ९ हजार हेक्टर हे ऊस लागणीचे तर ८५ हजार ७९२ हेक्टर हे खोडवा क्षेत्र आहे. त्यामुळे सरासरी उतारा पाहिला तर साधारणता १ कोटी ४० लाख टनापर्यंत गाळप होऊ शकते.
अपेक्षित गाळपापेक्षा किमान २५ लाख टनाने कमी होण्याची शक्यता आहे. साखर कारखान्यांची गाळप हंगामाची तयारी अंतिम टप्यात आली असली तरी दिवाळीनंतरच हंगाम गती घेणार हे निश्चित आहे.
मागील हंगामात ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करताना कारखान्यांची दमछाक झाली होती. अपेक्षित ऊस न मिळाल्याने अनेकांची धुराडी ९० दिवसातच थंडावली.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उसाचे क्षेत्र जास्त असल्याने उसाचे उत्पादन १ कोटी ६० लाख टनापर्यंत जाईल असा अंदाज साखर उद्योगाचा होता.
मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात मे महिन्यापासून सतत पाऊस आहे. यंदा पावसाचा फारसा जोर नसला तरी गेली चार महिने बहुतांश काळ ढगांनी व्यापलेले राहीले.
त्यामुळे उघडीप नसल्याने सुर्यप्रकाश पुरेसा मिळाला नसल्यामुळे उसाची अपेक्षित वाढ झालेली नाही. उसाचे क्षेत्र जास्त असले तरी उसाच्या वाढीत अडचणी आल्या आहेत.
त्यात, ऑगस्टमध्ये झालेली अतिवृष्टी व पुरामुळे ६७८३ हेक्टरवरील उसाचे नुकसान झाले आहे. हे सगळे पाहता यंदा उसाचा सरासरी उतारा कमी मिळणार आहे. त्यातही एकूण उसापैकी १ लाख ९ हजार १७२ हेक्टर लागण तर ८५ हजार हेक्टर खोडवा आहे.
दरम्यान, बहुतांशी कारखान्यांची दसऱ्याच्या मुहूर्तावर गव्हाणीत मोळी टाकण्याची तयारी आहे. पण, यंदा २३ ऑक्टोबरपर्यंत दिवाळी असल्याने त्यानंतरच हंगामाला गती येणार आहे.
बीडसह मराठवाड्यात आलेल्या पुराचा देखील उसतोड कामगारांच्या येण्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
दृष्टिक्षेपात जिल्ह्यातील ऊस क्षेत्र (हेक्टर)
आडसाली - २५,००१
खोडवा - ८५,७९२
पूर्वहंगामी - ४१,४३६
सुरू - ४२,७३५
कर्नाकटातील हंगामाचा होणार परिणाम
कर्नाटकात साधारणतः १५ ऑक्टोबरपासून हंगामाला सुरुवात होऊ शकते. त्याचा परिणाम सीमाभागातील 'जवाहर', 'शाहू', 'गुरुदत्त' या कारखान्यांवर होतो. 'जवाहर' व 'गुरुदत्त'च्या एकूण गाळपापैकी ३५ टक्के तर 'शाहू'चा सव्वा लाख टन ऊस कर्नाटकातून येतो. त्यामुळे या कारखान्यांचे कर्नाटकातील हंगामाकडे लक्ष असते.
सततच्या पावसामुळे उसाची वाढ झालेली नाही. त्यामुळे गतवर्षीपेक्षा क्षेत्र कमी असले तरी किमान १० टक्के उसाला फटका बसू शकतो, हा प्राथमिक अंदाज आहे. - विजय औताडे, साखर उद्योगातील तज्ज्ञ
अधिक वाचा: Purgrasta Madat : पूरग्रस्तांच्या खात्यावर बुधवारपासून दहा हजार रुपये मदत जमा होणार