दुर्मीळ प्राणी आणि अति-दुर्मीळ वनस्पर्तीसाठी आश्रयस्थान म्हणून जंगले काम करतात. परंतु, लोकसंख्येचा स्फोट, शेतीचे व्यापारीकरण आणि वाढती जंगलतोड हे अनेक देवराईंच्या मुळाशी आले आहे. पण, देवराईचे योग्य संवर्धन आणि संरक्षण धोरण आवश्यक आहे.
'कांतारा' हा चित्रपट लोकप्रिय झाला, पण या चित्रपटातील उत्सव हा वनाचे रक्षण करणाऱ्या स्थानिक देवतांवर आधारित आहे. हीच ती देवराई. देवराई या ग्रामदेवता या संकल्पनेशी संबंधित असतात. मोठ्या संख्येने, विभिन्न स्थानिक कला-प्रकार आणि लोक-परंपरा देवराईच्या देवतांशी संबंधित आहेत.
सनातन, बौद्ध, जैन आणि शीख धर्म यासारख्या भारतीय वंशाच्या अनेक धर्मामध्ये देवराईला यात्रेचे ठिकाण मानले जाते. देवराईची जंगले बऱ्याचदा मंदिरे, मठ, तीर्थक्षेत्रे, स्मशानभूमीशी संबंधित आढळतात. अनेक समाजांत निसर्गाचा परंपरेने आदर, पूजा केली जाते. काही वनस्पती आणि प्राण्यांना पवित्र मानले जाते, इतकेच नव्हे तर जंगलाच्या काही भागाला स्थानिक लोक 'पवित्र' मानतात, म्हणूनच या जंगलांना 'संरक्षण' मिळालेले आहे.
देशातील ही 'देवराई' नावाने ओळखली जाणारी जंगले धार्मिकदृष्ट्या संरक्षित आहेत आणि त्यांचे संरक्षण करणाऱ्या समुदायासाठी त्यांचे धार्मिक महत्त्व असते. अशा जंगलांमध्ये शिकार करणे आणि लाकूड तोडण्याला मनाई आहे. मथ किंवा वाळलेली, पडलेली लाकडे गोळा करणे यांना परवानगी मिळते. परंतु, अशा वनांचे संरक्षण करण्यासाठी स्वयंसेवी संस्था स्थानिक गावकऱ्यांसोबत काम करतात.
पारंपरिकपणे आणि काही प्रकरणांमध्ये आजही समुदायाचे सदस्य गस्त घालून या देवराईचे संरक्षण करतात. वन्यजीव (संरक्षण) अमेंडमेंट कायदा, २००२ अंतर्गत, 'देवराई'सारख्या जंगलांना सरकारी संरक्षण दिलेले आहे. ही जंगले, दुर्मीळ प्राणी आणि अति-दुर्मीळ वनस्पर्तीसाठी आश्रयस्थान म्हणून काम करतात. परंतु, लोकसंख्येचा स्फोट, शेतीचे व्यापारीकरण आणि वाढती जंगलतोड है अनेक देवराईंच्या मुळाशी आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने देवरायांच्या संवर्धनासाठी दिलेल्या निर्देशाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २३ एप्रिल रोजी एक शासन आदेश काढून मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहेत. देवरायांचे संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी वन विभागाच्या अंतर्गत असलेल्या जैवविविधता मंडळाच्या विविध कक्षांसाठी निश्चित केली आहे.
दुसरीकडे देवरायांमधील 'आयडेन्टिफाय फॉरेस्ट'ला वन संवर्धन अधिनियम, १९८० अंतर्गत संरक्षण दिले असताना अशा जमिनींवर विकासकामे करण्यासाठी वन विभागाची परवानगी गरजेची असताना राज्यमंत्री योगेश कदम यांनी देवराईमध्ये रखडलेले विकास प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना वन विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे देवरायांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार दुटप्पी भूमिका घेत असल्याचे आरोप पर्यावरण अभ्यासकांनी केले आहेत.
राज्यात सुमारे तीन हजार देवराया आहेत. काळूबाई, रानजाई, भैरोबा, विंझाई, म्हसोबा, सोनजाई, आंबेश्वर अशा अनेक देवांच्या नावाने त्या-त्या देवतांची जंगलातील मंदिरे व त्या भवतालचा परिसर तेथील आदिवासी, गावकरीच जतन करत असतात. राज्यात विशेषतः पश्चिम घाटात अनेक देवराया आहेत. या देवरायांच्या परिसरात वृक्षतोड, चराई यांनाही बंदी आहे.
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोनच जिल्ह्यांत मिळून सुमारे २,५०० देवरायांची नोंद आहे. त्यापैकी १६०० सिंधुदुर्गात तर उर्वरित रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. या जिल्ह्यांत जवळजवळ प्रत्येक गावात एक किंवा दोन देवराया आहेत आणि सुमारे नऊशे ते हजार वेगवेगळ्या वनस्पती आढळतात. त्यापैकी शंभराहून जास्त दुर्मिळ आणि लुप्त वनस्पती यातील बन्ऱ्याच देवरायांमध्ये आहेत.
या दोन्ही जिल्ह्यांतील देवराया महसूल विभागाच्या ताब्यात आहेत. देवरायांच्या संवर्धनासाठी काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. राज्य जैवविविधता मंडळाकडे अंमलबजावणीसाठी मनुष्यबळ उपलब्ध नसल्यास त्यांनी स्थानिक संस्थांना मदतीस घ्यावे, असे मत कोकणातील देवराईचे अभ्यासक प्रतीक मोरे यांचे आहे.
जैवविविधता म्हणजे काय....
जैवविविधता म्हणजे पर्यावरणात असणारे वैविध्यपूर्ण जीवन, वेगवेगळे पक्षी, प्राणी, वनस्पती, किडे-कीटक आणि सूक्ष्मजीव हे सारे या जैविक अस्तित्वाचा आधार आहेत. या वैविध्यपूर्ण जिवांच्या गरजा, त्यांचे एकमेकांवर असलेले अवलंबित्व, जगण्यासाठी त्यांना हवे असणारे नैसर्गिक घटक, पोषक वातावरण हे सारे मिळून एक जैववैविध्य तयार होते.
मूलभूत सौंदर्यालाच बाधा
• देशात असंख्य देवराया असून, या देवरायांमधील जंगल स्थानिक लोकांनी थार्मिक भावनेने संरक्षित ठेवले आहे. काही देवराया वन खात्याकडे, काही खासगी मालकीच्या, काही सामाजिक वनीकरण विभागाकडे, तर काही गावांच्या मालकीच्या आहेत.
• पण अलिकडे मूळ दगडांची मंदिरे आणि चौथरे यांची जागा सिमेंटच्या आर. सी. सी. मंदिरांनी घेतल्यामुळे मूलभूत सौंदर्यालाच बाधा पोहोचलेली आहे. तेथील अंतर्गत बांधकामासाठी थोड्याफार प्रमाणात वृक्षतोडही झालेली आहे. त्यापैकी गगनबावडा, राधानगरी, आजरा, गारगोटी, चंदगड या परिसरातील देवराई बऱ्यापैकी सुस्थितीत आढळतात.
• बाकी अंदुरची महादेवराई, सुनगावची केदारलिंगराई, अंदूरची रासाई मोराई, नरवेलीची गांगोबा, करंजफेनची विठ्ठलाई इत्यादी देवराया विकासाच्या नावाखाली तोडल्या गेल्या. तर वाकीघोलची वाकेश्वर, लखमापूरची गांगोबाराई सारख्या देवरायांवर धरणे व पाणलोट क्षेत्रामुळे अवकळा आली.
• पण या बिकट परिस्थितीतही काही श्रद्धाळू गावकरी आणि ग्रामस्थांमुळे हे ऑक्सिजन पार्क तग धरून आहेत. महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती आहे. पण देवराईचे योग्य संवर्धन आणि संरक्षण धोरण आवश्यक आहे.
संदीप आडनाईक
उपमुख्य उपसंपादक, कोल्हापूर.