वैभव साळकर
अवकाळीचा कहर झाला आणि वातावरणातील बदलाचा फटका फळ बागायतदार शेतकऱ्यांना बसला. नुकसानीमुळे बागायतदार संकटात सापडला असताना नुकत्याच सुरू झालेल्या गुलाबी थंडीने बागायतदारांना दिलासा दिला आहे.
सध्याची थंडी आणि कडक उन्हावरच आंब्याचा मोहोर अवलंबून आहे. आता ही थंडी किती काळ टिकून राहते, यावर सर्व काही अवलंबून आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड, वेंगुर्ला परिसरात गेल्या आठवड्याभरापासून पडत असलेली थंडी कायम राहिली तर मात्र मोहोर फुटत असलेल्या हापूस आंब्याच्या चांगल्या हंगामाची अपेक्षा आहे.
सलग २१ दिवस जर १४ डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमान राहिले तर आंब्याला चांगला मोहर फुटतो, असे कृषितज्ज्ञांचे मत आहे. असेच वातावरण राहिले तर मार्चमध्ये हापूस बाजारात दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
१५ दिवस थंडी राहिल्यास काय परिणाम होणार?
• सलग २१ दिवस जर तापमानात घट झाली आणि थंडीचा जोर वाढला तर त्याचा परिणाम थेट आंब्यावरील मोहोरावर होणार आहे.
• किमान थंडीमुळे का होईना मोहर वाढतोय ही शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे. साधारणतः कल्टारचा वापर केलेल्या बागांमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये, तर नैसर्गिकरीत्या डिसेंबर-जानेवारीमध्ये आंब्याला मोहोर येतो.
• याशिवाय नैसर्गिक मोहोरही वाढतो. त्यामुळे बागा आता बहरतील आणि उत्पादनात वाढ होईल, असा अंदाज वर्तवलेला आहे.
• पडलेली थंडी पंधरवडाभर कायम राहिली तर मोहर फुटण्यास मदतगार राहील. पोषक वातावरण राहिल्यास यंदाचा हंगाम चांगला राहील, असेच संकेत आहेत.
कलमांना पालवी, आशा उंचावल्या
वातावरणातील बदलामुळे देवगड भागातील तळेबाजार, वरेरी, शिरगाव, किंजवडे या भागातील कलम केलेल्या आंब्यांना आता पालवी आली असून मोहोर फुटणार आहे.
अवकाळी पावसामुळे यंदा आंबा चांगला येईल, अशी आशा नव्हती. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून पडत असलेल्या गुलाबी थंडीमुळे चांगला मोहोर येईल ही अपेक्षा आहे. ही थंडी आणखीन पंधरा दिवस अशीच राहिल्यास अपेक्षित मोहोर येईल. - सर्वेश साटम, आंबा बागायतदार.
