गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून, त्यामुळे राज्यातील १७ जिल्ह्यांमधील तब्बल साडेपाच लाख हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
नांदेड, बुलढाणा, धाराशिव यासारख्या जिल्ह्यांत शेतातील पिके वाहून गेल्याने शेतकरी कोलमडून पडला आहे. काही जिल्ह्यांत ऐन फुलोऱ्यात आलेल्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला असून, उडीद, मुगासारखी पिके हातून गेली आहेत.
या पावसाचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसला असून, जिल्ह्यातील तब्बल २ लाख ५९ हजार हेक्टरवरील पीक नष्ट झाले आहे.
गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने ऑगस्टच्या तिसऱ्या पंधरवड्यात हजेरी लावल्याने शेतकरी आनंदात होते. मात्र, त्याचा रौद्रावतार पाहून शेतकऱ्यांना चांगलीच धडकी भरली आहे.
नांदेडसह धाराशिव, यवतमाळ, अकोला, सोलापूर, जळगाव या जिल्ह्यांत पावसाने अक्षरशः कहर केला आहे. नांदेड जिल्ह्यात तर सर्वच तालुक्यांमध्ये शेतीचे नुकसान झाले असून, अनेक गावांत शेती पाण्याखाली गेली आहे.
एकूण झालेल्या राज्यात नुकसानीपैकी सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यातच झाले आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात एकूण ५ लाख ४९ हजार ७८५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
त्यात नांदेड जिल्ह्यातील २ लाख ५९ हजार ७८९ हेक्टरचा समावेश आहे. त्याखालोखाल यवतमाळ जिल्ह्यात ८० हजार ९६९, तर अकोला जिल्ह्यात ४३ हजार ७०३ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे.
नुकसान झालेल्या पिकांमध्ये सोयाबीन, कापूस, मका, मूग, उडीद, ऊस, केळी, बाजरी, भाजीपाला, तूर, तसेच फळ पिकांचा समावेश आहे. सोयाबीन पिकाला फुलोरा आल्याने या पिकाला मोठा फटका बसला आहे.
जिल्हानिहाय नुकसान (हेक्टरमध्ये)
बुलढाणा - १०,७०२
अमरावती- १२,३६१
यवतमाळ - ८०,९६९
अकोला - ४३,७०३
वर्धा - ७७६
सोलापूर - ४१,४७२
अहिल्यानगर - ३
धुळे - २३
जळगाव - १२,३२७
नांदेड - २,५९,७८९
हिंगोली - ४०,०००
परभणी - १४,०००
संभाजीनगर - २,०७४
जालना - २,१४६
बीड - ९३०
धाराशिव - २८,५००
लातूर - १०
एकूण - ५,४९,७८५
अधिक वाचा: Kanda Anudan : कांदा अनुदान योजनेचा सुधारित जीआर आला; या जिल्ह्याच्या अनुदानात बदल