राजाराम लोंढे
कोल्हापूर : राज्यात जूनअखेर पीक कर्ज परतफेडीची आकडेवारी पाहता, १० हजार ७३ कोटींची थकबाकी शेतकऱ्यांकडे आहे.
एका बाजूला राज्यात थकबाकीचे हे चित्र असताना वसुलीमध्ये 'कोल्हापूर' विभाग मात्र आघाडीवर राहिला. कोकण विभागाची थकबाकी 'कोल्हापूर'पेक्षा कमी असली, तरी त्यांच्या पीक कर्जाचे प्रमाण खूपच कमी आहे.
जिल्ह्यांची तुलना करायची झाल्यास 'सातारा' जिल्हा वसुलीमध्ये राज्यात नंबर वन राहिला असून, सर्वाधिक थकबाकी अमरावती विभागात २८७० कोटींची आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीने केलेली कर्जमाफीची घोषणा, त्यानंतर सातत्याने त्याबाबत होणारी आंदोलने यामुळे नियमित पीक कर्जाची परतफेड करणारा शेतकरी काहीसा थांबला होता.
राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची यंदा पीक कर्ज वसुली करताना पुरती दमछाक उडाली. जिल्हानिहाय वसुलीचे प्रमाण पाहता नाशिक, अमरावती विभागात मोठ्या प्रमाणात थकबाकीचे प्रमाण अधिक दिसते.
कोकण विभागाची थकबाकी २५३.९१ कोटी दिसत असली, तरी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे-पालघर, रायगड या जिल्ह्यांत केवळ १०२३.३० कोटींचे पीक कर्ज वाटप आहे.
त्या तुलनेत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात ६९३६.५२ कोटीचे पीक वाटप करूनही थकबाकीचे प्रमाण ३५९.६९ कोटी आहे. सर्वाधिक थकबाकी अमरावती विभागात २ हजार ८७० कोटी रुपयांची आहे.
'कोल्हापूर' विभागातील वसुली चांगली का?
◼️ सेवा संस्थांचे भक्कम जाळे.
◼️ साखर कारखान्यांच्या बिलातून होणार थेट वसूल.
◼️ पीक कर्जाची वेळेत परतफेड करण्याची शेतकऱ्यांची मानसिकता.
कर्जमाफीपेक्षा 'प्रोत्साहन'चा अधिक लाभ
◼️ केंद्र व राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मराठवाडा, विदर्भात अधिक झाला आहे.
◼️ त्या तुलनेत कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात थकबाकीचे प्रमाण कमी असल्याने कर्जमाफीचा लाभ कमी झाला.
◼️ कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्याने येथे सर्वाधिक लाभप्रोत्साहन अनुदानाचा झाला आहे.
जून २०२५ अखेर पीक कर्ज वाटप व थकबाकी (कोटींमध्ये)
विभाग | पीक कर्जाचे वाटप | थकबाकी
अमरावती | ५,७५०.७७ | २,८७०.२८
नाशिक | ८,८४७.६३ | २,८४९.१९
लातूर | ३,८६४.९३ | १,०९२.६७
नागपूर | ३,४४५.६२ | ९३८.१६
औरंगाबाद | ३,८६४.९३ | ८८९.८२
पुणे | ५,७४१.९७ | ८१३.१७
कोल्हापूर | ६,९३६.५२ | ३५९.६९
कोकण | १,०२३.३० | २५३.९१
अधिक वाचा: राज्यातील जमीन मोजणीची प्रकरणे आता तातडीने निकाली लागणार; आले नवीन १२०० रोव्हर