वाडा : परतीच्या पावसाने थैमान घातले असून, हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला आहे. सोन्यासारखे आलेले भातपीक अद्यापही शेतात पडून आहे.
त्यावर पाणी साचल्याने भाताला कोंब फुटले आहेत. हजारो हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले असून, त्यावर सरकारही बुक्क्यांचा मार देत आहे.
शिल्लोत्तर येथील एका शेतकऱ्याला चक्क नुकसानभरपाई म्हणून फक्त दोन रुपये ३० पैसे बँक खात्यात जमा झाल्याने शेतकरी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. वाडा कोलम हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध असून, त्याला बाजारपेठेत चांगली मागणी आहे.
यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने पीक चांगले आले होते. सोन्यासारखे पीक आल्याने शेतकरी आनंदात होते; मात्र, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची पुरती निराशा झाली. भात पीक मातीमोल झाले आहे.
सरकारकडून नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्यात आले. त्यानंतर काही शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली. वाडा तालुक्यातील शिल्लोत्तर येथील शेतकरी मधुकर बाबूराव पाटील या शेतकऱ्याची ११ एकर जमीन आहे.
त्यांच्या नावावर सात एकर; तर पत्नी व मुलीच्या नावे चार एकर, अशी एकूण जमीन असताना पाटील यांना नुकसानभरपाईपोटी सरकारकडून दोन रुपये ३० पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज मोबाइलवर आला.
लाखो रुपयांचे नुकसान झाले असताना फक्त दोन रुपये ३० पैसे नुकसानभरपाई देऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळले असल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, सरकारवर रोष व्यक्त केला आहे.
पेंढा भिजल्यामुळे जनावरांचीही उपासमार
◼️ कापणीस आलेले भात पीक शेतात पडले असून, त्यावरून पाणी वाहून जात आहे.
◼️ अनेक दिवस पीक पाण्यात राहिल्याने दाण्यांना कोंब आले आहेत.
◼️ भाताबरोबर पेंढाही काळा पडल्याने जनावरेही हा पेंढा खाणार नसल्याने त्यांच्यावरही उपासमारीची वेळ येणार आहे.
◼️ पुढील आठ महिने जनावरांना खायला काय द्यावे, असा प्रश्न पशुपालक शेतकऱ्यांना पडला आहे.
अधिक वाचा: राज्यातील 'या' वीजग्राहकांना मिळणार आता २५ वर्षे मोफत वीज; काय आहे योजना? जाणून घ्या सविस्तर
