केशव जाधव
पुसेगाव: पुसेगाव-बुध रस्त्यावर असलेल्या वेटण ओढ्यावर नेर तलावाच्या पाण्याचा फुगवटा आल्याने ऐरणीत साठवलेला कांदा छाती इतक्या पाण्यातून बाहेर काढण्याची कसरत शेतकऱ्याला करावी लागली.
काटेवाडी शिवारातील शेतकऱ्यांना या पाण्याच्या फुगवट्यामुळे मानसिक त्रासाबरोबर मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
तर ओढ्यात प्रचंड पाणी असल्याने कोणत्याही प्रकारची यंत्रणा ओढ्या पलीकडे जाऊ शकत नसल्याने काही क्षेत्रात अद्याप पेरणीही झाली नाही. या वेटण ओढ्यावर किमान साकव पूल तरी व्हावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
एप्रिल महिन्यात काढलेल्या कांदा पिकाला चांगला भाव मिळत नसल्याने ऐरणीत साठवून ठेवलेला कांदा विक्री साठी बाहेर काढताना शेतकऱ्याला सध्याच्या नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागत आहे. होणाऱ्या नाहक त्रासाने या भागातील शेतकरी वर्ग चांगलाच मेटाकुटीला आला आहे.
खटाव तालुक्याच्या उत्तर भागात ब्रिटिश कालीन नेर तलावाची पातळी काही प्रमाणात वाढवल्याने पाणी साठ्यात वाढ झाली, मात्र त्याची झळ आसपासच्या भागातील शेतकऱ्यांना झाली आहे. बुध नजीक असलेल्या काटेवाडी गावच्या शिवारातील शेतकऱ्यांची शेती अडचणीत आली आहे.
अजित काकासो जगदाळे यांना वेटण ओढ्याच्या पलीकडे शेतात ऐरणीत साठवलेला कांदा बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड आणि नाहक त्रास सोसावा लागला आहे.
ऐरणी पासून सुमारे ४०० फूट अंतरावर १४ हमालांच्या साह्याने प्रति पिशवी ९० रुपये इतका खर्च करून छाती इतक्या पाण्यातून कांदा पिशव्या डोक्यावर काढाव्या लागल्या आहेत.
मजुरांनी ही जीवाची पर्वा न करता शेतकऱ्याला मदत केल्याने समाधान व्यक्त होत आहे. एवढे करूनही कांद्याला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
वेटण ओढ्यात पाण्याचा फुगवटा गेली कित्येक वर्षे सातत्याने होत असल्याने या भागातील शेतकरी बैल किंवा यंत्राच्या मदतीने पेरणी करू शकत नाहीत. शेतकरी हात कोळप्याने काकऱ्या ओढून टोकण पद्धतीने का होईना शेती करत आहेत.
त्यामुळे या ओढ्यावर चांगला पुल व्हावा किमान साकव पूल तरी बांधण्यास या काटेवाडी शिवारातील सुमारे ६० एकर क्षेत्रातील शेती वहिवाटी खाली येईल. लोकप्रतिनिधीनी याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.
अधिक वाचा: शेतजमिनीच्या वाटणीवरून होणारे वाद होणार कमी; नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा नवा निर्णय