नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे आगार म्हणून नावलौकिक असलेल्या बागलाण तालुक्यात यंदा ६२ हजार हेक्टरवर विक्रमी कांदा लागवड झाली आहे. विशेष म्हणजे अजूनही कांदा रोपे उपलब्ध होत असल्याने अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात उत्सुक असल्याने गत तीन वर्षांतील यंदाची कांदा लागवड विक्रमी म्हटली जात आहे.
बागलाणमधील उन्हाळी कांदा लागवड अंतिम टप्प्यात असली, तरी शेतकरी आजही कांद्याचे उळे बाजारात उपलब्ध होत आहे. परिणामी, कांदा उत्पादनाचा कल जाणून येत आहे. बदलत्या वातावरणामुळे कांदा पिकाला बुरशी, मर, करपा या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेतकरी फवारणी करत आहेत.
मजूर टंचाईतही कामे सुरू
मजुरांची कमतरता असल्याने खुरपणी शक्य होत नसल्याने तणनाशक फवारणीवर जोर आहे. यंदा रासायनिक खतांच्या किमती वाढल्या आहेत. खरीप हंगामातील मका काढणीनंतर शेतकरी कांदा पिकाकडे वळतो. परतीच्या पावसामुळे कांदा रोपांची वाट लागली होती. परंतु, उत्पादकांनी पुन्हा दुबार रोपे टाकली व त्यांची निगा राखत उशिराने का होईना लागवड केली. अद्यापही मजूर टंचाईमुळे लागवड सुरू आहे.
गतवर्षी दमदार पाऊस झाल्याने विहिरीच्या पाण्याची पातळी टिकून राहील, याची शेतकऱ्यांना शाश्वती आल्याने यावर्षी विक्रमी कांदा लागवड झाल्याची नोंद होत आहे. वाढत्या थंडीमुळे पावसाळी कांद्याच्या उत्पादनात वाढ झाली. - नरेंद्र महाले, तालुका कृषी अधिकारी.
अशी झाली लागवड....
सन २०२२-२३ यावर्षी ५२ हजार २४,
सन २०२३-२४ यावर्षी ४४ हजार २८६,
२०२४-२५ वर्षात ६२ हजार ४६५,
हेक्टरवर कांदा लागवड होत आहे.