जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यासह आन्वा, वाकडी, कुकडी, कठोरा बाजार, जानेफळ गायकवाड परिसरात सध्या लग्नसराईचा धूमधडाका सुरू असतानाच दुसरीकडे शेतीकामांची लगबग वाढली आहे.
त्यामुळे "एकीकडे लगीनसराई, तर दुसरीकडे शेतीकामाची घाई" अशी बळीराजाची अवस्था झाली असून, खरीपपूर्व मशागतीसाठी केवळ २० ते २५ दिवस उरले आहेत.
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन सुरू केले आहे. यंदा भोकरदन तालुक्यात सुमारे १ लाख ९ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार खते, चियाणे व कीटकनाशकांची मागणीही वरिष्ठ स्तरावर नोंदविण्यात आली आहे.
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतकरी आता पेरणीच्या तयारीला लागला आहे. शेतात मशागतीची कामे वेगाने सुरू असून उन्हाळी हंगामातील पिके काढून शेतकरी खरिपासाठी जमीन तयार करत आहे.
मात्र मागील काही वर्षांपासून दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि शेतीमालाला न मिळणारा भाव यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघाडले आहे. त्यामुळे आगामी पेरणीसाठी अनेक शेतकरी बैंका व सावकारांचे उंबरठे झिजवत आहेत.
एकंदर, कमी कालावधीत सर्व मशागतीची कामे पूर्ण करण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे असून "यंदा तरी निसर्ग मेहरबान व्हावा अशी आशा बळीराजा व्यक्त करत आहे.
खरीप हंगाम हा तालुक्यातील प्रमुख हंगाम मानला जातो. कपाशी, मका, सोयाबीन, उडीद, मूग, तूर आदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होत असल्याने या पिकांसाठी आवश्यक साहित्याची तयारी सुरू आहे.
गतवर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते, तर रब्बी हंगामालाही अवकाळीचा फटका बसला, मागील सहा वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचला आहे.
शेतकऱ्यांनो, उन्हात काम करताना काळजी घ्यावी
सध्या तापमानात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी सकाळी ११ वाजेपर्यंत व संध्याकाळी ५ नंतरच कामे करावीत, डोक्याला कापड बांधावे, पुरेसे पाणी प्यावे, सावलीत विश्रांती घ्यावी, तसेच उष्माघात टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले.
शेतकरी ट्रॅक्टरद्वारे नांगरणी, काडीकचरा जाळणे, शेणखत टाकणे, जुनी पिके उपटणे अशा मशागतीच्या कामांत व्यस्त आहे. यात अनेकजण सकाळी काम करण्यावर भर देत आहे.
तालुक्यातील ट्रॅक्टरचे प्रतीएकरी दर असे.
नांगरणी - १५००
कल्टिव्हेटर - १५००
रोटर मारणे - १५००
वखरणी पाळी - १४००
पेरणी - १३००
सध्या उन्हामुळे शेतकऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. त्यातच लग्नसराईमुळे कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचीही कसरत कराची लागते. सध्या ट्रॅक्टरद्वारे मशागतीला प्राधान्य दिले जात असून, इंधन दरवाढीमुळे मशागतीचे दरही वाढले आहेत. नांगरणीसाठी प्रतिएकर २००० रुपये घेतले जात आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. - नारायण बाघ, ट्रॅक्टर मालक.
हेही वाचा : हिरवळीचे खते देतील साथ; शेतकरी राजांनो, यंदा शेती खर्चात करा मोठी कपात
