चंदगड : चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील ५ कारखान्यांनी संघटित होऊन ३४०० रुपये जाहीर केलेली उचल मान्य नसल्याने ओलम कारखान्यावर रविवारपासून गळीत हंगाम बंद ठेवून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.
सोमवारी ओलम कारखाना व्यवस्थापनाने पहिली उचल ३५०० रुपये दर जाहीर केल्याने 'स्वाभिमानी'च्या लढ्याला यश आले.
चालूवर्षी इको-केन, अथर्व-दौलत, ओलम, आजरा साखर कारखाना व नलवडे गडहिंग्लज या कारखान्यांनी ३४०० रुपये पहिली उचल जाहीर करून आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केला.
स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून ओलम कारखान्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले होते.
स्वाभिमानीच्या रेट्यामुळे ओलम प्रशासनास ३५०० रुपये पहिली उचल देण्यास भाग पडले. सोमवारी सायंकाळी ६ वाजता कारखाना प्रशासनाने लेखी पत्र दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी कर्नाटकचे माजी मंत्री शशिकांत नाईक, काडसिद्धेश्वर स्वामी, राजेंद्र गड्यान्नावर, प्रा. दीपक पाटील, कर्नाटक रयत संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा: 'दालमिया'चे चालू गाळपातील ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; किती रुपयाने केले पेमेंट?
