Join us

पाण्याचा निचरा होईना; पिकांमध्ये साचले पावसाचे पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 09:58 IST

फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव गांगदेव शिवारातून जाणाऱ्या राजूर राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने रस्त्यालगतचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्गिका तयार केली नसल्याने या भागातील ४० एकर क्षेत्रातील पिकांमध्ये पावसाचे पाणी साचले असून, या पाण्याचा निचरा होत नसल्याने ही पिके सडू लागली आहेत. फुलंब्री येथून राजूरकडे राष्ट्रीय महामार्ग ७५२ एच हा पिंपळगाव गंगादेव शिवारातून जातो.

रऊफ शेख

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव गांगदेव शिवारातून जाणाऱ्या राजूर राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने रस्त्यालगतचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्गिका तयार केली नसल्याने या भागातील ४० एकर क्षेत्रातील पिकांमध्ये पावसाचे पाणी साचले असून, या पाण्याचा निचरा होत नसल्याने ही पिके सडू लागली आहेत. फुलंब्री येथून राजूरकडे राष्ट्रीय महामार्ग ७५२ एच हा पिंपळगाव गंगादेव शिवारातून जातो.

या महामार्गाचे काम काही महिन्यांपूर्वी करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गाची उंची ५ फूट झाली आहे. या रस्त्यालगत येणारे पावसाचे पाणी काढण्याचे नियोजन संबंधित कंत्राटदाराने केले नाही. येथे छोटेखानी पूल उभारला असला, तरी त्यातून पाणी बाहेर जाण्याची मार्गिका तयार केली नाही. परिणामी या भागातील गट नं. २३०, २२९, २२८, २२७ या मधील ४० एकर शेतातील पिकांमध्ये १ व २ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी साचले आहे. हे पाणी शेताबाहेर जात नसल्याने या भागातील पिके सडत आहेत. काही ठिकाणची पिके पिवळी पडत आहेत.

या शेतात आजच्या घडीला ऊस, मका, सोयाबीन, कपाशी, मूग ही पिके पूर्णपणे पाण्यात आहेत. या पिकांचे होणारे नुकसान पाहून येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांनी याबाबत विविध लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानुसार काही लोकप्रतिनिधींनी या पिकांची पाहणीही केली; परंतु पुढे काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे येथील शेतकरी नाराज आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

प्रशासनाने मदत देण्याची मागणी

• या ४० एकर क्षेत्रातील मका, सोयाबीन, ऊस, कपाशी, मूग ही पिके जोमात आलेली असताना, पिकामध्ये पाणी तुंबल्याने ही पिके वाया गेली आहेत. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

• प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी येथील शेतकरी कचरू सूर्यभान थोरात, संतोष सूर्यभान थोरात, किसन भावराव जाधव, रविंद्र गायके, त्रिंबक थोरात, दिगंबर काकडे, दादाराव गायके, संजय गायके, सुधाकर गायके, लक्ष्मण काकडे, शशिकला थोरात, नाना थोरात, अजिनाथ थोरात आदींनी केली आहे.

पाणी काढणे सुरू

पिंपळगाव गांगदेव येथील शेतात साचलेले पाणी काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. - विद्या चामले, उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग.

हेही वाचा - Farmer Success Story : मराठवाड्याच्या कोरडवाहू शेतीला सेंद्रिय जोड देत आधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध करणाऱ्या शेतकऱ्याची वाचा यशकथा

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपाऊसहवामानपाणीफुलंब्रीमराठवाडाविदर्भ