दत्ता पाटील
पावसाळा नोव्हेंबर महिना आला तरी संपला नाही. त्यामुळे सांगली जिल्ह्यात हवामानातील बदलाचा द्राक्षबागांना फटका बसला आहे. जिल्ह्यातील सुमारे ७० टक्के द्राक्षबागांमधून फळधारणाच झाली नाही. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.
लाखो रुपयांचा खर्च करूनही उत्पन्नाची आशा राहिली नसल्यामुळे द्राक्ष बागायतदार हताश झाले आहेत. त्यामुळे द्राक्षबागा टिकवण्यासाठी खर्च करायचा कुठून? या चिंतेने हतबल द्राक्ष बागायतदार शासन मदतीची आस लावून बसला आहे.
वर्षभर सरासरी एकरी तीन ते नी चार लाखांचा खर्च केल्यानंतर द्राक्षबागेतून उत्पन्न मिळते. कोरोना लाट येण्यापूर्वी द्राक्ष बागायतदारांसाठी समाधानकारक परिस्थिती होती.
मात्र, मागील सलग चार वर्षापासून सातत्याने होत असलेल्या हवामान बदलामुळे द्राक्ष बागायतदार उद्ध्वस्त झाला आहे. यंदा मे महिन्यात सुरु झालेला पावसाळा आजअखेर कायम राहिला आहे. यामुळे अनेक द्राक्षबागांमध्ये फळधारणाच झाली नसल्याचे दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी द्राक्ष संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या पाहणीत ४० टक्क्यांपेक्षा जास्त द्राक्षबागांचे नुकसान झाल्याचे सांगितले होते.
सद्यःस्थितीत जिल्ह्यातील १० टक्के द्राक्षबागांची फळ छाटणी झाली असून, त्यापैकी ७० टक्के द्राक्षबागांमधून फळधारणाच झाली नसल्याचे दिसून येत आहे. काही द्राक्षबागांमध्ये केवळ पाच ते दहा घडसंख्या असून, अनेक ठिकाणी द्राक्षबागा पूर्णपणे वांझ झाल्याचे दिसते.
खरड छाटणीपासून फळ छाटणीपर्यंत सरासरी मजुरी आणि औषधांचा एक लाख रुपयांचा खर्च येतो. यंदा खरह छाटणीचा हंगाम सुरू झाल्यापासूनच पावसाळा कायम राहिल्यामुळे सरासरीच्या दुप्पट खर्च करावा लागला.
एकरी दीड ते दोन लाख रुपयांचा खर्च करूनही द्राक्षबागेत घड नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा पूर्णपणे वाया गेल्या आहेत.
इतके होऊनही पुढचा हंगाम घ्यायचा असेल, तर वर्षभर औषधांचा खर्च करावाच लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उत्पादक कर्जाच्या खाईत लोटले गेले आहेत.
शासनाकडून नुकतेच अवकाळी अतिवृष्टी झालेल्या द्राक्ष बागायतदारांना एकरी १९ हजार रुपयांची तुटपुंजी मदत झाली. मात्र, ही मदत चार दिवसांच्या औषध खर्चालाही पुरेल इतपत नाही.
अतिवृष्टी, अवकाळीसाठी मिळालेली मदत
जिल्ह्यातील बाधित क्षेत्र - २०,६२४ हेक्टर
जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या - ३८,००० हजार
रूपये शासनाकडून शेतकऱ्यांना मिळालेली भरपाई - ४६,४०,६२,५००
एकरी लाख रूपये द्या
परकीय चलन मिळवून देणाऱ्या आणि लाखो हातांना रोजगार देणाऱ्या द्राक्ष इंडस्ट्रीला टिकयाराचे असेल, तसेच द्राक्ष बागायतदारांना दिलासा द्यायचा असल्यास एकरी एक लाख रुपयांची भरीव मदत द्यावी आणि कर्जमाफी करावी, अशी अपेक्षा द्राक्ष बागायतदार यांच्याकडून व्यक्त होत आहे.
यंदा थोडीफार घडनिर्मिती आलेल्या द्राक्षबागांना हवामानाचा फटका बसला आहे. नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी पावसाळा सुरू राहिल्यामुळे, द्राक्ष निर्मिती झालेल्या बागांमध्येदेखील घडकुजीचे संकट आहे. शासनाने तत्काळ भरीव मदत केली नाही, तर द्राक्ष उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. - अंकुश माळी, दाक्ष उत्पादक, सावळज
अधिक वाचा: रब्बी हंगामातील 'या' सहा पिकांसाठी विमा अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु; जाणून घ्या सविस्तर
