आशपाक पठाण
मराठवाड्यातील केशर आंब्याने यंदा गुजरातसह परराज्यांच्या बाजारपेठेत चांगलाच गोडवा निर्माण केला आहे. लातूरच्या फळबाजारातून आतापर्यंत तब्बल २ हजार टन केशर आंब्याची गुजरात, उत्तर प्रदेशसह विविध राज्यांत निर्यात झाली आहे.
मात्र, दुसरीकडे आवक झपाट्याने वाढल्याने आंब्याच्या दरात मोठी घसरण झाली असून, व्यापारी आणि बागायतदार दोघेही अडचणीत आले आहेत. मागील महिन्यात १५० रुपयांपर्यंत पोहोचलेला केशर आंब्याचा दर आता घसरून ५० ते ६० रुपयांवर आला आहे.
गेल्या आठवड्यापासून बाजारात दररोज ५० ते ८० टन केशर आंब्याची आवक होत असल्याने फळबाजारात साठवण आणि लिलावासाठी जागा अपुरी पडत आहे.
त्यामुळे व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचीही मोठी गैरसोय होत आहे. लातूरचा फळबाजार आता केशर आंब्याचे महत्त्वाचे हब बनत असून मराठवाड्यासह शेजारच्या राज्यांतूनही मोठ्या प्रमाणावर आंब्याची आवक होत आहे. गुजरातच्या बाजारात केशरला दरवर्षी चांगली मागणी असल्याचे सांगण्यात आले.
गावरान आंबा दुर्मीळ; केशरचीच चलती...
एकेकाळी चवीसाठी प्रसिद्ध असलेला गावरान आंबा आता बाजारातून जवळपास हद्दपार होत चालला आहे. फळधारणा कमी होणे, हवामानातील बदल आणि गोडव्यात झालेली घट यामुळे ग्राहकांचा कल केशरकडे वाढला आहे. गोड चव, आकर्षक रंग आणि टिकाऊपणा यामुळे केशरला सर्वाधिक मागणी मिळत आहे.
मोठ्या फळबाजाराची गरज
• फळाचे ठोक विक्रेते शब्बीर बागवान म्हणाले, लातूर हे आता केशर आंब्याचे मोठे केंद्र बनले आहे. उत्पादन वाढल्याने आवकही मोठ्या प्रमाणात होत आहे. येथून परराज्यात मोठ्या प्रमाणावर आंबा निर्यात केला जात आहे.
• मात्र, फळबाजारात माल ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने मोठ्छा आणि आधुनिक फळबाजाराची गरज निर्माण झाली आहे.
ठोक विक्रीचे बाजारातील दर
फळबाजारात मोठ्या आकाराच्या केशर आंब्याला प्रतिटन ४ हजार ते ८ हजार रुपये दर मिळत आहे. मध्यम आकाराच्या आंब्याला ५ ते ६ हजार रुपये प्रतिटन, तर लहान आकाराच्या आंब्याला ३ ते साडेतीन हजार रुपये दर मिळत आहे.
हेही वाचा : उन्हात काम करत असाल तर काळजी घ्या; हृदय अन् किडनीवर येतोय ताण
