पुणे : 'नमो शेतकरी सन्मान योजने'त शेतकऱ्यांना देण्यात येणारा २ हजार रुपयांचा सातवा हप्ता आज मंगळवारी (दि. ९) वितरित केला जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या हप्त्याचे राज्यातील ९२ लाख ९१ हजार शेतकऱ्यांना ऑनलाईन वितरण केले जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
यासाठी राज्य सरकारने १ हजार ९३२ कोटी ७२ लाख रुपयांच्या तरतुदीला नुकतीच मंजुरी दिली होती. पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या २० हप्त्यांसोबत हा हप्ता दिला जाणार होता. मात्र, त्याला महिन्याचा विलंब झाला आहे.
केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रति वर्ष, प्रति शेतकरी ६ हजार रुपये देण्यात येतात. या अनुदानामध्ये राज्य सरकारने आणखी ६ हजार रुपयांची भर घालणारी 'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजना सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत सहा हप्ते देण्यात आले आहेत. तर एप्रिल ते जुलै या कालावधीचा सातवा हप्ता मंगळवारी (दि. ९) देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून १ हजार ९३२ कोटी ७२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पीएम किसान योजनेसाठी राज्यातील एकूण ९२.९१ लाख शेतकरी पात्र ठरले होते. याच शेतकऱ्यांना हा २ हजार रुपयांचा हप्ता देण्यात येणार आहे.
त्यासाठीची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे. पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच हा हप्ता दिला जातो. केंद्राने पीएम योजनेचा २० वा हप्ता २ ऑगस्ट रोजी वितरित केला.
अधिक वाचा: e pik pahani : ई-पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना ४५ दिवसांचा स्वतंत्र कालावधी मिळणार