मंगळवेढा तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना शासन नियमानुसार देय असलेल्या मोफत वाळू वाटपाच्या उपक्रमास सुरुवात झाली असून, आंधळगाव मंडळातील पात्र लाभार्थ्यांना मंगळवेढा येथे ई-चलन देत मोफत वाळूचे वितरण करण्यात आले.
पंचायत समिती सभापती दीपाली ताड व डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी तहसीलदार मदन जाधव, पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे, उद्योगपती आनंद ताड, निवासी नायब तहसीलदार शहापुरे, नोडल अधिकारी श्रीनिवास शेरला उपस्थित होते.
मंगळवेढा तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत एकूण ९,२१९ घरकुल लाभार्थी असून, त्यापैकी ८,५७९ लाभार्थी पात्र ठरले आहेत. सध्या सुरू असलेल्या घरकुल बांधकामांच्या टप्प्यानुसार आवश्यकतेनुसार वाळू मोफत देण्यात येणार आहे.
घरकुल बांधकामासाठी वाळू सहज उपलब्ध व्हावी या उद्देशाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ३१ डिसेंबर २०२५ रोजी परिपत्रक काढून वाळू वाटपाची कार्यपद्धती निश्चित केली आहे.
त्यानुसार घरकुलाच्या बांधकामाचे टप्पे निश्चित करण्यात आले असून, पाया खोदताना दोन ब्रास, तर पुढील बांधकामासाठी तीन ब्रास वाळू मोफत देण्यात येत आहे.
मंगळवेढा पॅटर्न'ची जिल्हाभर चर्चा
◼️ मंगळवेढा महसूल प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने वाळू वाटप उपक्रम सुरू केला आहे.
◼️ दर मंगळवार व शुक्रवारी नियमितपणे वाळू वाटप होत आहे.
◼️ प्रत्येक मंडळातील लाभार्थ्यांना त्यांच्या जवळच्या वाळू गटातून वाळू मिळावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
◼️ मंगळवेढ्यातील हा 'मोफत वाळू वाटप पॅटर्न' सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
अधिक वाचा: गुढीपाडव्यापासून पुढील तीन दिवस वातावरणात बदल; राज्यात 'या' जिल्ह्यांत गारपिटीचा इशारा
