कोल्हापूर परिमंडळातील कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत मलेरियाचे ४० रुग्ण आढळल्याची माहिती हिवताप विभागाचे सहायक संचालक डॉ. संजय रणवीर यांनी दिली. शनिवारी 'जागतिक हिवताप दिन' असून या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली.
डॉ. रणवीर म्हणाले, प्रतिवर्षी २५ एप्रिल हा दिवस जगभरात 'जागतिक हिवताप (मलेरिया) दिन' म्हणून साजरा केला जातो. मलेरियाची लागण झाल्यास थंडी वाजून ताप येणे, प्रचंड घाम येणे, डोकेदुखी आणि अंगदुखी अशी लक्षणे दिसू लागतात. वेळेत उपचार न मिळाल्यास हा आजार गंभीर रूप धारण करू शकतो, योग्य वेळी निदान झाल्यास तो पूर्णपणे बरा होतो.
राज्य आणि केंद्र शासन 'राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमा' अंतर्गत सन २०३० पर्यंत देशाला हिवतापमुक्त करण्याचे ध्येय ठेवून काम करत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून, राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल २०२६ पासून 'ग्राम समृद्ध अभियान' आणि 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' यांसारखे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल टाकण्यात आले आहे.
मलेरिया टाळण्यासाठी काय करावे
• घराबाहेर पडताना पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे.
• मच्छरदाणीचा वापर करणे आणि मच्छर प्रतिबंधक क्रिम लावणे.
• आजूबाजूला पाणी साचू न देणे; कारण डासांची पैदास ही साचलेल्या पाण्यातच होते.
• घरातील कूलर, जुने टायर, भांडी, उघड्या टाक्या, व्हॅट पाईप किंवा गुरांचे गोठे या ठिकाणी पाणी साचल्यास तिथे डासांच्या अळ्यांची वाढ होते.
हेही वाचा : उन्हात काम करत असाल तर काळजी घ्या; हृदय अन् किडनीवर येतोय ताण
