मंगळवेढा : राज्यातील ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असलेल्या मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाच्या लहरी स्वभावामुळे ज्वारीपेरणीचे चित्र गंभीर बनले आहे.
सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पेरणीस मोठा विलंब झाला असून, परिणामी गोरगरिबांच्या भाकरीचे प्रमुख पीक असलेली ज्वारी यंदा महागण्याची शक्यता आहे. परिणामतः कडब्याचे उत्पादनही घटणार आहे.
तालुक्यात ज्वारीचे एकूण क्षेत्र ३४ हजार १३५ हेक्टर असून, त्यापैकी केवळ २ हजार १३० हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. म्हणजेच, फक्त ६.२ टक्के पेरणीची नोंद शासकीय आकडेवारीत झाली आहे.
गतवर्षी ३५ हजार ४५७हेक्टर क्षेत्रापैकी २३ हजार २३९ हेक्टर (६५.५४ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली होती. म्हणजेच, यंदा तब्बल ६० टक्क्यांनी क्षेत्र घटले आहे. ही आकडेवारी चिंताजनक परिस्थिती अधोरेखित करते.
ब्रिटिश काळापासून मंगळवेढा है सुपीक काळ्या जमिनीमुळे ज्वारी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मालदांडी ज्वारी राज्यातील अनेक भागांत गोरगरिबांच्या थाळीतील भाकरीचा आधार ठरते.
मात्र, यंदा पावसाने सुरुवातीस ओढ दिल्यानंतर सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे काळ्या शिवारात पाणी साचले. परिणामी, दरवर्षी महालक्ष्मी विसर्जनानंतर सुरू होणारी उत्तरा नक्षत्रातील पेरणी यंदा मोठ्या प्रमाणात लांबली.
सद्यःस्थितीत हरभरा, करडई आणि गहू या पर्यायी पिकांना वेग आला आहे. हरभऱ्याचे क्षेत्र ४ हजार ४२५ हेक्टर, त्यापैकी ५४० हेक्टर (१२.२ टक्के) पेरणी झाली आहे.
गव्हाचे क्षेत्र ३ हजार २८९ हेक्टर असून, सध्या बंगाळ वातावरणामुळे लागवड सुरू आहे. करडईचे क्षेत्र १ हजार २०२ हेक्टर असून, त्यापैकी २१० हेक्टर (१७.४ टक्के) पेरणी पूर्ण झाली आहे.
कडबा टंचाईचे संकट
ज्वारी उत्पादन घटल्याने जनावरांसाठी लागणाऱ्या कडब्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटणार आहे. तालुक्यातील दुभती जनावरे आणि पशुपालकांसमोर चाऱ्याचा तुटवडा निर्माण होणार आहे. मागील वर्षों मुबलक कडब्यामुळे पशुधनाला दिलासा मिळाला होता.
ज्वारी पेरणीतील घट ही फक्त उत्पादनापुरतीच नाही, तर पशुधनाच्या खाद्यसाखळीवर परिणाम करणारी आहे. पावसाचे प्रमाण लक्षात घेतले, तर यंदा ज्वारी उत्पादनात ६० ते ७० टक्क्यांहून अधिक घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात ज्वारीचे दर वाढतील आणि पशुखाद्याच्या कडव्याचेही दर चढतील. - प्रा. वेताळा भगत, मंगळवेढा
अधिक वाचा: कृषी समृद्धी योजनेंतर्गत 'या' चार घटकांसाठी आला ५,६६८ कोटींचा निधी; शेतकऱ्यांना कसा होणार फायदा?
