पुणे: राज्य सरकारने पणन विभागामार्फत हमी भावाने १४ जिल्ह्यांत मका खरेदी केला आहे. मका आता शिधापत्रिकांवरून वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
फेब्रुवारी अखेर खरेदी करण्यात आलेला मका वितरित करण्याचे निर्देश पुरवठा विभागाला देण्यात आले आहेत.
गव्हाच्या बदल्यात मका देण्यात येणार असून, प्राधान्य योजनेत प्रति माणशी मिळणाऱ्या धान्यात आता २ किलो गव्हासोबत १ किलो मका देण्यात येणार आहे.
तर, अंत्योदय योजनेतील प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला ११ किलो गव्हासोबत ११ किलो मका देण्यात येणार आहे. मात्र, सामान्य नागरिक या मक्याचे काय करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्य सरकार पणन विभागामार्फत हमी भावाने शेतकऱ्यांकडून मका खरेदी करत आहे. हा मका प्रति क्विंटल २४०० रुपये या दराने खरेदी केला जात आहे. राज्यात ही खरेदी १४ जिल्ह्यांमध्ये होत आहे.
त्यात संभाजीनगर, जालना, अमरावती, नागपूर, बुलढाणा, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, सांगली, सातारा, अहिल्यानगर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे.
राज्यात ९ मार्चपर्यंत ५ लाख १३ हजार ६८२ क्विंटल खरेदी झाली आहे. राज्य सरकारने हा मका आता पुरवठा विभागाच्या माध्यमातून शिधापत्रिकांवरून वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत
पुणे जिल्ह्यात ९ मार्चपर्यंत ८ हजार ८२७ क्विंटल मक्याची खरेदी झाली आहे. हा मका सध्या बारामती येथील गोदामांमध्ये साठवून ठेवला आहे.
हा मका बारामती आणि इंदापूर तालुक्यात वितरित होईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली. त्यात बारामती तालुत्यात अंत्योदय शिधापत्रिकांची संख्या ७ हजार ९८८ इतकी आहे.
या शिधापत्रिकांवर प्रत्येकी ११ किलो मका देण्यात येईल, तर, प्राधान्य योजनेत लाभार्थ्यांची संख्या ३ लाख ३० हजार १५७ इतकी आहे. या लाभार्थ्यांना प्रत्येकी एक किलो मका देण्यात येईल.
इंदापूर तालुक्यात अंत्योदय शिधापत्रिकांची संख्या ४ हजार ४०५ तर प्राधान्य योजनेतील लाभार्थी संख्या २ लाख २५ हजार ६४४ इतकी आहे.
अधिक वाचा: यंदा ज्वारीच्या भाकरीची चव महागणार; मालदांडी ज्वारीला प्रतिक्विंटल काय मिळतोय दर?
