आशियाई विकास बँक (ADB) अर्थसहाय्यित महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) (Maharashtra Agribusiness Network-MAGNET) प्रकल्प पुढील ६ वर्षासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
सदर मॅग्नेट प्रकल्पामध्ये डाळींब, केळी, संत्रा, मोसंबी, सिताफळ, पेरु, चिकू, स्ट्रोबेरी, भेंडी व मिरची (हिरवी व लाल) या १० फलोत्पादन व काही फुलपिके यांचा समावेश आहे.
प्रकल्पाचे मुख्य उद्देश
◼️ सदर पिकांच्या मुल्यसाखळ्यांमध्ये खाजगी गुंतवणूक आकर्षित करुन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे.
◼️ फळे व भाजीपालांचे काढणी पश्चात नुकसान कमी करणे.
◼️ साठवणूक क्षमता वाढविणे.
◼️ मालाची मूल्यवृध्दी करणे इ.
मॅग्नेट प्रकल्पांतर्गत आंबा, काजू, लिंबू व पडवळ या आणखी चार पिकांचा समावेश करण्यात आला असून, सदर प्रकल्पांतर्गत समाविष्ट फळ-फुलपिकांची एकूण संख्या १५ झाली आहे.
शासन निर्णयात काय म्हटले आहे?
◼️ महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) (Maharashtra Agribusiness Network-MAGNET) प्रकल्पाचा विस्तारीत स्वरुप असलेला रु.२१०० कोटी (२५० Million USD) रक्कमेचा मॅग्नेट २.० प्रकल्प सन २०२५-२०३१ या कालावधीकरिता राबविण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.
◼️ तसेच, मॅग्नेट २.० प्रकल्पाचा Preliminary Project Report (PPR) आर्थिक व्यवहार विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार यांना सादर करण्याकरीता PPR मसुद्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
◼️ मॅग्नेट २.० प्रकल्पामध्ये सद्याच्या मॅग्नेट प्रकल्पांतर्गत समाविष्ट १५ फलोत्पादन पिकांव्यतिरिक्त द्राक्षे, पपई, हळद, अंजीर, शेवगा, टोमॅटो, आले व फणस या ८ नवीन पिकांचा समावेश राहील.
◼️ मॅग्नेट २.० अंतर्गत राज्यातील कृषी व्यवसाय प्रणाली अधिक बळकट करण्यासाठी पायाभूत सुविधा सुधारणा, वित्तीय व संस्थात्मक सहाय्याचा विस्तार आणि महाराष्ट्राच्या फलोत्पादन पीक निर्यातीला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
अधिक वाचा: ऊसदर नियंत्रण बैठक झाली; एफआरपी व इतर ऊस प्रश्नांविषयी काय चर्चा? वाचा सविस्तर