नाशिक : शालेय रेकॉर्डमध्ये बऱ्याचदा विद्यार्थ्यांची नावे किंवा जन्मतारखा चुकतात. भविष्यात नावावरून अडचण निर्माण होऊ नये, म्हणून दुरुस्तीसाठी शाळेमार्फत कागदपत्रांसह शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केला जातो.
शालेय रेकॉर्डमध्ये काय अन् कशामुळे होतात चुका?
शाळेच्या नोंदणीदरम्यान झालेल्या विद्यार्थ्यांच्या नावाच्या स्पेलिंगमधील चुकांमुळे शालेय रेकॉर्डमध्ये नावात चुका होतात.
बदलाची पद्धत आणि कागदपत्रे कोणती?
मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे, प्रतिज्ञापत्र, वर्तमानपत्रातील प्रकाशनाचे कटिंग, राजपत्र अधिसूचनेची प्रत, अपडेटेड सरकारी ओळखपत्र, फोटो, अर्ज अशी कागदपत्रे लागतात.
कुठे आणि कसा अर्ज सादर करायचा?
शैक्षणिक रेकॉर्डमध्ये बदलासाठी परीक्षा बोर्ड किंवा विद्यापीठाकडे अर्ज करता येतो. याची माहिती शाळेत मिळते.
बदलांना कुणाकडून मिळते मंजुरी?
शैक्षणिक रेकॉर्डमध्ये बदलासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज केल्यानंतर परीक्षा बोर्ड किंवा विद्यापीठाकडून मंजुरी मिळते.
कधीपर्यंत रेकॉर्डमध्ये करता येतो बदल ?
पहिली ते दहावीपर्यंतच नावात किंवा शैक्षणिक नोंदीत बदल करता येतो. दहावी प्रमाणपत्रावर नाव आल्यानंतर संधी संपते.
दहावीनंतर नाव, जन्मतारखेत बदलाची पद्धत काय?
दहावीनंतर नाव किंवा जन्मतारखेत बदल करायचा असेल, तर त्यासाठी राजपत्र करावे लागते. त्यासाठी नोटरी व अन्य प्रक्रिया आहे.
खोडाखोड केल्यास होतो गुन्हा दाखल...
शाळेच्या दाखल्यांवर विद्यार्थ्यांचे नाव बिनचूकपणे लिहिले जाते. त्यात चूक असेल, तर स्वतः खोडाखोड करू नये. शाळेच्या दाखल्यात स्वतः खोडाखोड किंवा अन्य बदल केल्यास तो फौजदारी गुन्हा ठरतो. बदलासाठी कायदेशीर प्रक्रियाच करावी.
लागतो महिन्याचा कालावधी...
कागदपत्रात बदल करायचा असल्यास त्याची प्रक्रिया जास्त कालावधी घेणारी असल्याची तक्रार करण्यात येत आहे. किमान एक महिना लागू शकतो.
दहावी प्रमाणपत्रावर येणारे नाव अंतिम...
दहावीच्या प्रमाणपत्रावर माध्यमिक परीक्षा बोर्डाकडून नाव आल्यानंतर ते अंतिम ठरते, पुन्हा बदलता येत नाही.
दरवर्षी रेकॉर्डमध्ये दुरुस्ती
शैक्षणिक रेकॉर्ड किंवा नावात बदलाविषयी दरवर्षी अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज परीक्षा मंडळाकडे कागदपत्रांसह दाखल होतात.
