नाशिक : नामपूर (ता. बागलाण) परिसरातील काटवण भागात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या बेमोसमी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले. बिलपुरी, चिराई, दोधनपाडा, गोंमरपाडा, राहुड, टेंभे आदी गावांमध्ये अवघ्या अर्धा ते एक तास चाललेल्या या पावसाने रब्बी हंगामातील कांदा लागवडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
काटवण परिसरात सध्या रब्बी हंगामासाठी कांदा लागवड जोमात सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या कर्जातून कांद्याचे बियाणे खरेदी करून रोपे तयार केली होती, तर काही ठिकाणी लागवड अंतिम टप्प्यात होती. मात्र अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले. कोवळी कांद्याची रोपे आडवी पडली, कुजण्याची भीती निर्माण झाली असून अनेक शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे.
कांदा लागवडीसाठी बियाणे, रोपे, खते, औषधे, मजुरी व सिंचनावर आधीच हजारो ते लाखो रुपयांचा खर्च झालेला असताना या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटात ढकलले आहे. “रब्बी कांदा हेच आमच्या वर्षभराच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. पण निसर्गाने पुन्हा एकदा आमचं कंबरडं मोडलं,” अशी व्यथा शेतकरी व्यक्त करत आहेत.
मागील वर्षी २०२५ मध्येही अवकाळी पावसामुळे कांदा, मका पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यातच बाजारभावातील घसरणीने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. “कांदा ही गेला… मका ही गेला… आता जगायचं तरी कसं?” असा यक्षप्रश्न आज काटवण परिसरातील प्रत्येक शेतकऱ्यापुढे उभा आहे. निसर्गाच्या या अन्यायाविरुद्ध शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी आर्त मागणी होत आहे.
